मुंबई : लोकसभा प्रचाराला हळूहळू वेग पकडू लागला आहे. प्रचारसभा, मेळावे, पदयात्रा, कार्यकर्ता मेळावा, मंडळांच्या गाठीभेटी असा चौफेर प्रचार सुरू आहे. मात्र, या सगळ्या प्रचाराची मुख्य धुरा काही निवडक माणसे सांभाळत आहेत. सकाळी १० ते रात्री १० पर्यंतच्या सगळ्या दौऱ्याचे ग्राउंड लेव्हलवर नियोजन करण्याची जबाबदारी ही मंडळी सांभाळत आहेत.
प्रत्येक उमेदवाराकडे किमान दोन खंदे पदाधिकारी असतात. नाराजी, रुसवे-फुगवे यांची जाण असते. उत्तर-पूर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांची धुरा भावेश भानुशाली यांच्याकडे, तर महाविकास आघाडीचे संजय पाटील यांच्यासाठीचे नियोजन भाविक भानुशाली आणि रिद्धेश खानविलकर करत आहेत.कोणत्या भागात आपण अजून पोहोचलेलो नाही, कोणत्या वॉर्डात फेरी बाकी आहे, याचा दररोज रात्री आढावा घेतला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची आखणी होते. दुपारी २ ते संध्याकाळी सहा या वेळेत प्रचार बंद असतो. त्यावेळी कार्यकर्ते जेवायला घरीच जातात, असे खानविलकर यांनी सांगितले. बुधवारी आमचा उमेदवार अर्ज भरणार आहे. त्यानुसार मग प्रचाराची वाटचाल होईल.
रोजची कार्यक्रम पत्रिका तयार-
१) कोटेचा यांनी काही दिवसांपूर्वीच अर्ज भरला आहे. आमची रोजची कार्यक्रम पत्रिका तयार असते. त्यानुसार प्रचाराचे नियोजन होते.
२) दुपारी प्रचार बंद असल्याने काही वैयक्तिक भेटीगाठी होतात, अशी माहिती भावेश भानुशाली यांनी दिली.
३) ते प्रचाराचे नियोजन करत आहेत. त्यांच्या जोडीने धीरज कोटेचाही रोजच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवून असतात.
४) ज्या भागात प्रचार झाला असेल तेथील छायाचित्रे-तपशील प्रसारमाध्यमांना पोहचवण्याच्या सूचना दिल्या जातात.
५) त्यानंतर प्रसिद्धी पत्रक काढले जाते. प्रत्येक भागातील प्रचार आणि तेथे लोकांचा मिळालेला प्रतिसाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो