जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 05:01 PM2024-05-20T17:01:23+5:302024-05-20T17:10:37+5:30
Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
Uddhav Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात बूथवर इव्हीएम बिघडल्याच्या घटना घडल्या. अनेक बूथवर मतदानाला उशीर होत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आता यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. "निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचे दिसत आहे. मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून खूप दिरंगाई होत आहे, मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर करत आहे', असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला.
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपावर आरोप केला. उद्धव ठाकरे म्हणाले, संपूर्ण दिवसभर मतदानाची माहिती मी घेत आहे. मतदारांमध्ये खूप उत्साह आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला मतदान करा म्हणून मेसेज जात आहेत. त्याप्रमाणे मतदार उतरल्याचे दिसत आहे. पण, निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करत असल्याचे दिसत आहे. मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे प्रतिनिधींकडून खूप दिरंगाई होत आहे. विशिष्ट वस्त्यांमध्ये नावे दोन, तीन चारवेळी तपासली जात आहे. अनेक मतदारांना त्रास होत आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला. निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"मतदानाच्या ठिकाणी प्यायला पाणी ठेवलेले नाही तरीही मतदार रांगा लावून उभे आहेत. रांगा लावलेल्या मतदारांना आत गेल्यानंतर खूप वेळ लागतोय असं सांगितलं जात आहे, मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर करत आहे. पक्षपातीपणा करत आहे. मत नोंदवीत असताना दिरंगाई करत असल्याचे दिसत आहे. आता मतदानाला थोडावेळ जरी राहिला असला तरी मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
"ज्या बुथवर असा उशीर केला जात आहे तिथे असणाऱ्या पोलिंग एजंटांनी तिथे असणाऱ्या शिवसेना शाखेत त्याची नोंद करा. निवडणूक प्रतिनिधींची नावे विचारुन घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी सरकारच्या डावाला बळी पडू नका, पहाटेचे पाच वाजले तरीही मतदान करुनच बाहेर या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.