Join us

मोदींना दहा वर्षे महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाले, आता...; उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 2:02 PM

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

Uddhav Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचारसभांना जोर आला आहे. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले. दरम्यान, आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांच्याही सभा सुरू आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी 'सामना' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा टीझर प्रसिध्द झाला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे. 

"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित

उद्धव ठाकरे यांनी 'सामना' वृत्तपत्राला दिलेली मुलाखत रविवारी आणि सोमवारी या दोन भागात प्रकाशित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे या मुलाखतीत काय उत्तर देणार याची उत्सुकता लागली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत 'सामना'चे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. 

मोदी आणि शाह महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करतात, तसेच देशातील यंत्रणांचा वापर, काश्मीर, मुस्लिम, भ्रष्ठाचार या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिली आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा वर्षे महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाले आहेत आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदींनी अनुभवावा, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईत सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभांना मुंबईत येणार आहेत. पहिल्या दौऱ्यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत. महायुतीची शेवटची सभा १७ मे रोजी शिवाजी पार्कवर होणार असून या सभेत  पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीभाजपाशिवसेनालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४