Join us

मतदानाच्या दिवशी राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा  

By सचिन लुंगसे | Published: May 11, 2024 5:05 PM

मुंबई महानगर प्रदेशाला उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील बहुतांशी जिल्हयांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाला उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील बहुतांशी जिल्हयांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्हयांना गारपीटीचाही इशारा देण्यात आला आहे. राज्याला वाढते तापमान आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी वातावरणाला सामोरे जावे लागत असतानाच महाराष्ट्रातील लोकसभेचे चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी असुन त्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता अधिक आहे.

मराठवाडा, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात १८ मेपर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे. १४ मेपर्यंत संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर  जिल्ह्यात मध्यम अवकाळी पावसाची शक्यता आहे. १२ ते १४ मेपर्यंत कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीच्या शक्यतेची तीव्रता अधिक आहे. १६ मेपर्यंत मुंबई, उपनगरसह संपूर्ण कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ७ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

उष्णतेची लाट नाही-

१८ मेपर्यंत मुंबईसह कोकणातील कमाल व किमान तापमान सरासरी इतके म्हणजे ३३ व २५ तर उर्वरित महाराष्ट्रात ४० व २६ दरम्यान असेल. उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता किंवा रात्रीच्या उकाड्याची शक्यता जाणवणार नाही.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४पाऊस