बाप-लेक आमनेसामने! गजानन किर्तीकरांची घोषणा; अमोल किर्तीकरांविरोधात लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 08:32 PM2024-04-08T20:32:37+5:302024-04-08T20:36:50+5:30
गजानन कीर्तिकर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली होती.
मुंबई- ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उपनेते आणि युवा सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली असून शिंदे गट कीर्तिकरांच्याविरोधात कोणाला उमेदवारी देणार यावरुन जोरदार चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात बाप-लेक आमनेसामने येणार असल्याचे दिसत आहे. महायुतीकडून गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
गजानन कीर्तिकर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. आज एका कार्यक्रमात गजानन कीर्तिकर यांनी उमेदवारीची घोषणा केली. "अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात गजानन कीर्तिकर लढणार आहे. होय मी लढणार आहे. मला या निवडणुकीत लढा असं सांगितलं होतं. पण, मी मुलाविरोधात लढलं तर समाजात वाईट मेसेज जाईल असं मी सांगितलं होतं, असंही कीर्तिकर म्हणाले. आता अमोलने मी वडिलांविरोधात लढणार नाही असं सांगायला हवं, असंही गजानन कीर्तिकर म्हणाले.
"गजानन किर्तीकर प्रचाराच्या मैदानात म्हणजे विजय निश्चित"
आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना हरवण्यासाठी खासदार गजानन किर्तीकर प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. म्हणजे महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आज खा. गजानन किर्तीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. भाजपा आमदार राजहंस सिंह यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या न्यायपत्राचा खरपूस समाचार घेतला.
ईडीला निर्धाराने सामोरे जाणार-अमोल कीर्तिकर
"आपल्यावर कोणताही एफआयआर दाखल झाला नसतांना देखिल इडीच्या धमक्या आल्याचे ते स्वतः मतदारांशी बोलताना सांगतात. त्यांनी तर आपल्या पत्नी सुप्रिया व आपल्याला अटक झाली तर पुढे काय करायचे हे देखील सांगून ठेवले आहे व आपले स्वत:चे आणि कुटुंबाचे मन देखिल बनवले आहे. काही झाले तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आमदार,माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची साथ काही केल्या सोडणार नाही असे अमोल कीर्तिकर येथील नागरिकांना आश्वासित करतात.