Join us

"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:58 PM

Gajanan Kirtikar : राजकारणात पुढे जायला पाहिजे होते तशी अमोल किर्तीकरला पक्षात संधी मिळाली नाही. आता सुदैवाने त्याला संधी मिळाली. त्याच्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट आहे, ना नगरसेवक, ना आमदार डायरेक्ट खासदार , असं विधान गजानन किर्तीकर यांनी केलं आहे. 

Gajanan Kirtikar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा पार पडला. राज्यातील प्रचारसभा थंडावल्या आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीने रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली होती तर ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली. पण त्यांचे वडील खासदार गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आहेत. यामुळे मुलाविरोधात वडीलांनी प्रचार केल्याची जोरदार चर्चा सुरू होती. दरम्यान, आता गजानन किर्तीकर यांनी अमोल किर्तीकर यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. 'मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत',असं विधान गजानन किर्तीकर यांनी केलं आहे. 

मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गजानन किर्तीकर म्हणाले, आमची शिवसेना चुकीच्या पद्धतीने जात आहे म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. कुठला ईडी, किंवा खोका हा विषय माझ्यासाठी नाही. ही निवडणूक अटीतटीची आहे. राज्यातील दोन पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. निवडणूक आयोग आणि सुप्रीय कोर्टाच्या नंतर जनता कोणाच्या मागे आहेत हे पाहण्यासाठी ही निवडणूक आहे, असंही गजानन किर्तीकर म्हणाले.  मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर घरच्यांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या. यावेळी पत्नी, अमोल, सुन हे त्या पक्षात कशाला जाता, जाऊ नका. उद्धव ठाकरेंसोबत थांबा, असं म्हणत होते. म्हणून मी सोडून बाकी कोणीच माझ्यासोबत नाहीत,  मी एकटाच इकडे आहे. ५७ वर्षे उद्धव ठाकरेंसोबत होतो, माझ्या राजकारणातील चढ-उतार त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला होता, असंही किर्तीकर म्हणाले. 

मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत वाटते

"अमोलचं बोट धरुन मी त्याला शिवसेनेत आणलं नाही, तो कष्ट करुन आला आहे. अमोल प्रमाणिक आहे त्याला कोणतही व्यसन नाही, बाकीच्यांची मुल जशी राजकारणात पुढे पुढे करतात तशी त्याची वृत्ती नाही. तो सधा सुधा आहे. त्याने एवढं काम करुन त्याला कधी नगरसेवकाची उमेदवारी मिळाली नाही. शिवसेना भाजपाची अचानकपणे युती तुटली तेव्हा त्याला कांदीवली विधानसभेत उमेदवारी दिली. पक्षात राजकारणात पुढे जायला पाहिजे होते तशी त्याला पक्षात संधी मिळाली नाही. आता सुदैवाने त्याला संधी मिळाली. त्याच्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट आहे, ना नगरसेवक, ना आमदार डायरेक्ट खासदार , असं विधान गजानन किर्तीकर यांनी केलं आहे.  यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

टॅग्स :गजानन कीर्तीकरअमोल कीर्तिकरशिवसेनालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४