मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उद्धवसेनेने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर अशी इथे लढत असेल. मात्र, शिंदेसेनेचे या मतदारसंघातील विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर निवडणुकीत आपल्या मुलाविरोधात प्रचार करणार आहेत. त्यामुळे या वडील गजानन कीर्तिकर विरुद्ध मुलगा अमोल कीर्तिकर असा सामना प्रचारादरम्यान पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील फाटाफुटीमुळे वडील शिंदेसेनेत, तर मुलगा उद्धव सेनेत असे चित्र निर्माण झाले आहे.
गजानन कीर्तिकर यांनी २०१९ मध्ये ही जागा २.६० लाखांच्या मतांच्या फरकाने जिंकली होती. त्यांनी निरूपम यांचा येथे पराभव केला होता. आता त्यांच्याच जागेवर त्यांना वायकरांसाठी प्रचार करावा लागणार आहे.
वडीलबिडील कोणतीही फिलिंग नाही
१) आपण पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करून राजधर्माचे पालन करणार असल्याचेगजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले आहे. अमोल माझा मुलगा आहे. त्यामुळे मी त्याच्याविरोधात निवडणूक लढणार नसल्याचे मी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्पष्ट केले होते. पण तो माझा मुलगा असला तरी मी महायुतीच्याच उमेदवारीसाठी काम आणि प्रचार करणार आहे. या प्रकरणी वडीलबिडिल अशी कोणतीही फिलिंग नाही मी दुहेरी भूमिका घेणार नाही, असंही गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.
२)मी महायुतीचा नेता आणि तेथील विद्यमान खासदार आहे, मी समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मुलाविरोधात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी निवडणूक लढवत नसलो तरी आमच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.