सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 06:02 AM2024-05-04T06:02:17+5:302024-05-04T06:03:13+5:30
भाजपला संविधानात बदल करत आरक्षण संपुष्टात आणावयाचे आहे, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी उमेदवार अनंत गीते यांनी ही लढाई भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी असल्याचे सांगत मतदार सुजान असल्याचे सांगितले.
मुरुड जंजिरा : भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात दहा वर्षे आहे; पण त्यांनी सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले असल्याचा आरोप करीत चारशे पार सोडा, त्यांना दोनशेच्या आतच जागा राहतील, असा विश्वास उद्धवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुरुड येथील जाहीर सभेत व्यक्त केला.
भाजपला संविधानात बदल करत आरक्षण संपुष्टात आणावयाचे आहे, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी उमेदवार अनंत गीते यांनी ही लढाई भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी असल्याचे सांगत मतदार सुजान असल्याचे सांगितले. आमदार भाई जगताप, माजी आमदार पंडित पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
सभेला आमदार संजय पोतनीस, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, काँग्रेसचे मुरुड तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक आदी उपस्थित होते.
संजय निरुपम यांचा शिंदेसेनेत प्रवेश
ठाणे : काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले माजी खा. संजय निरुपम यांनी शुक्रवारी आनंद आश्रम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.
निरुपम यांना लोकसभा लढवायची होती. त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली होती. परंतु, त्यांना उमेदवार निश्चित झाल्याचे सांगितले. पक्षासाठी आपण काम करावे, असे सांगितले. त्यांनी तशी तयारी दर्शविली. ते प्रवक्ते तसेच समन्वयक म्हणून काम पाहतील.
अभिजित बिचकुले अपक्ष लढणार
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून ‘बिग बॉस फेम’ अभिजित बिचकुले यांनी शुक्रवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी आतापर्यंत नगरसेवक पदापासून खासदार पदापर्यंतच्या निवडणुका लढविल्या आहेत. सातारा लोकसभेतून निवडणूक लढविणारे बिचकुले यांनी कल्याण लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. सातारा मतदारसंघातून ते उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.