गजबजलेल्या मुंबईतील हॉटेल, दुकाने होती बंद; मतदानासाठी अनेक ठिकाणी शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:04 AM2024-05-21T11:04:47+5:302024-05-21T11:14:25+5:30
मुंबईच्या प्रवेशद्वारासह अन्य मार्गांवर नेहमीप्रमाणे रहदारी दिसून आली नाही.
मुंबई : गजबजलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सोमवारी अनेक ठिकाणी शुकशुकाट पाहावयास मिळाला. मुंबईच्या प्रवेशद्वारासह अन्य मार्गांवर नेहमीप्रमाणे रहदारी दिसून आली नाही. मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर झाल्यामुळे बहुतांश हॉटेल, दुकाने बंद होती. तसेच इस्टर्न फ्री वे सह अटल सेतूवर शुकशुकाट होता.
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू होती. आठवड्यातील सात दिवस कायम गजबजलेला मुंबईतील भेंडीबाजारही एकदम शांत होता. याशिवाय भुलेश्वर मार्केट, मनीष मार्केट, मुंबादेवी भागात निवडक दुकाने सुरू होती. रस्त्यावर फार थोडी वाहने होती. त्यामुळे वाहतूककोंडीचा मागमूसही नव्हता. तसेच दक्षिण मुंबईत मंत्रालयासह शासकीय कार्यालये, कॉर्पोरेट कार्यालये, बँका, शेअर मार्केट आहे. त्यामुळे दररोज सकाळी सर्व वाहनांची गर्दी, दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडीचे चित्र नेहमीच असते. मात्र, मतदानामुळे हा मार्ग कोंडीमुक्त होता. त्यामुळे मुंबईत एका टोकावरून दुसऱ्या टोकावर काही तासांत जाणे शक्य होते. याचवेळी या भागात सर्वत्र मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांची गर्दी दिसून येत होती.
प्रोत्साहनासाठी सवलत-
मतदान केंद्राजवळची हॉटेल्स आणि दुकाने बंद ठेवण्यात आली असली तरी काही भागांत हॉटेल, रेस्टॉरंट्स खुली होती. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी हॉटेलचालकांकडून १० ते ३० टक्के सवलत देण्यात आली होती.