Narendra Modi ( Marathi News ) : देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे यांच्या आजारपणात दररोज तब्येतीची चौकशी करत होतो असं मोदी म्हणाले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला आता खोट्या प्रेमाची गरज नाही, असे विधान केले आहे. दरम्यान, लोकमत समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेल्या आदराबाबत भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमत समुहाला विशेष मुलाखत दिली. लोकमत समुहाचे सह व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी पंतप्रधानांना अनेक मुद्द्यावर प्रश्न विचारले. त्यावेळी नरेंद्र मोदींनीही दिलखुलास उत्तरे दिली.
या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी मला आता खोट्या प्रेमाची गरज नाही, असे विधान केले आहे. त्यामुळे एक थेट प्रश्न विचारतो. भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? हा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचे उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. आपल्या देशाच्या इतिहासातील ते अत्यंत प्रमुख आणि प्रभावी नेते आहेत. बाळासाहेबांनी आयुष्यभर राष्ट्रहिताचे राजकारण केले. तुष्टीकरणाच्या राजकारणाचा त्यांनी विरोध केला. राजकारण काहीही असले तरी बाळासाहेबांच्या कुटुंबीयांतील प्रत्येक सदस्याबाबत मी प्रतिष्ठा कायम राखली आहे. बाळासाहेबांचा चाहता म्हणून मीच नाही तर त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांचा वारसा सांगणाऱ्या लोकांची कृती पाहून वेदना होत आहेत, असंही पीएम मोदी म्हणाले.
"मुंबई आणि तेथील जनता बाळासाहेबांच्या जिव्हाळ्याची होती. मुंबई बॉम्बस्फोटांच्या आरोपींना सोबत घेऊन त्यांचे उमेदवार प्रचार करत असल्याचे पाहून बाळासाहेबांना काय वाटले असते? ज्या लोकांनी सनातन धर्माचा विरोध केला, अशा लोकांसोबत गेल्याचे पाहून बाळासाहेबांना कसे वाटले असते? औरंगजेबाचा जयजयकार आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांसोबत युती केल्याचे बाळासाहेबांना रुचले असते का ? अशा गोष्टी केल्यानंतर बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा त्यांना हक्क आहे का ? सत्तेपेक्षा बाळासाहेबांनी कायमच तत्त्वे जपली. आता मात्र लोकांना सत्ता हेच सर्वकाही वाटते. यावर मी अधिक काय बोलणार?, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.