Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीत जागावाटपांसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. काल 'राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाने दुसरी यादी जाहीर केली. बीडसाठी बजरंग सोनवणे आणि भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत.
काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्यांनी मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत. "निवडणूक लढायची असेल तर मैत्रिपूर्ण लढत लढणार, जर वरिष्ठांचे यावर एकमत झाले असेल तर जर ही जागा त्यांना सुटली असेल तर मग शेवटी कार्यकर्त्यांचा जो आग्रह असेल तर अपक्ष लढण्याची वेळ आली तर आम्ही तसं लढणार, असंही काँग्रेसच्या दयानंद चोरगे म्हणाले.
"आम्ही चर्चेतून तोडगा काढू"
दरम्यान, आता राष्ट्रवादीचे भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली."हा आमच्या घरचा विषय आहे, हा विषय आम्ही घरात बसून सोडवू. काँग्रेस, शिवसेना हे सगळे पक्ष आमचं कुटुंब आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही कुटुंबात बसून सोडवू',असंही सुरेश म्हात्रे म्हणाले.
सांगली लोकसभेतही तिढा
सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत एकमत झालेलं नाही. शिवसेना ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर या जागेवर काँग्रेसनेही दावा केला आहे. या जागेवर मैत्रिपूर्ण लढतीचा इशाराही काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी दिला आह. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार घोषित
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दुसरी उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात बीड आणि भिवंडी मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे आहे. बीडमधून बजरंग सोनवणे तर भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
मागील निवडणुकीत भिवंडीतून काँग्रेसचा उमेदवार होता. त्यामुळे काँग्रेस भिवंडीवरील दावा सोडायला तयार नव्हता. मात्र, या निवडणुकीत बाळ्यामामा यांच्यासारखा उमेदवार असल्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी, असा शरद पवार गटाचा आग्रह होता. भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना ते कडवी टक्कर देऊ शकतात, हे शरद पवार गटाने पटवून दिल्याने त्यांच्या पक्षाकडे ही जागा गेली.