महाविकास आघाडीच्या राज्यात 36 प्लस जागा येतील; शिवसेना नेते भास्कर जाधव यांचे वक्तव्य
By मनोहर कुंभेजकर | Published: May 13, 2024 05:43 PM2024-05-13T17:43:43+5:302024-05-13T17:45:28+5:30
2024 ची लोकसभा निवडणूक ही विचार विरुद्ध अहंकाराची लढाई आहे, असं देखील ते म्हणाले.
मनोहर कुंभेजकर, मुंबई: 2024 ची लोकसभा निवडणूक ही विचार विरुद्ध अहंकाराची लढाई आहे. महाराष्ट्रात मी प्रचारासाठी फिरलो तेव्हा सर्वत्र नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तीव्र संताप लोकांमध्ये दिसला. महायुतीला अहंकार आहे, त्यांच्या राज्यात 45 प्लस जागा येतील अशी त्यांची मस्ती होती. इस बार 400 पार अशी घोषणा देणाऱ्या भाजपाला इस बार भाजप तडीपार असा नारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आणि तो आवाज देशात घुमला. महाराष्ट्रात 36 सभा मोदी आणि शाह घेतील, पण महाविकास आघाडीच्या राज्यात 36 प्लस जागा येतील असे ठाम प्रतिपादन शिवसेना नेते,आमदार भास्कर जाधव यांनी काल रात्री मालाड पूर्व, कुरार येथे केले. एक अकेला सबपे भारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर त्यांचे नाव उद्धव ठाकरे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. तर महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तिकरांसाठी ही निवडणूक सोपी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
मालाड पूर्व येथील कुरार गावच्या स्वा. सावरकर मैदानात शिवसेना उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी आमदार विद्या चव्हाण, राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना नेते,आमदार सुनिल प्रभू, आपच्या प्रिती मेनन- शर्मा, राष्ट्रवादीचे अजित रावराणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभू यांची भाषणे झाली.
कम्युनिष्ट पक्ष, समाजवादी पक्षाच्या स्थनिक नेत्यांनीही अमोल कीर्तिकर यांनाच निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करण्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले.
शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्या भाजपला ४ जून नंतर शिल्लक ठेवायचे नाही असा निर्धार सर्व नेत्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. ‘निष्ठावान विरुध्द गद्दार’ लढाईत निष्ठावान शिवसेना उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा विजय निश्चित होईल असा विश्वासही सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला.
या निवडणूक प्रचारसभेचे सूत्रसंचालन उपविभागप्रमुख भाई परब आणि दिंडोशी विधानसभा संघटक प्रशांत कदम यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता मोठया प्रमाणात उपस्थित होती.