Lok Sabha Election ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महायुतीत जागावाटपासाठी खलबतं सुरू असताना महाविकास आघाडीतील जागावाटपही अंतिम टप्प्यात आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाबाबत जवळपास एकमत झाल्याचे समजते. नव्या फॉर्म्युल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना २०, काँग्रेस १८ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागांवर लढू शकते. तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला हे तीन पक्ष आपआपल्या कोट्यातून जागा देतील, अशी माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुनज आघाडीकडून विविध प्रस्ताव मांडत जागावाटप अंतिम करण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं जात आहे. "वंचित बहुजन आघाडीची जेव्हा कुठल्याही पक्षासोबत युती नव्हती, कोणासोबतच आमची चर्चा नव्हती, तेव्हा आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या २७ जागांवर लक्ष केंद्रित केले होते. महाविकास आघाडीने जेव्हा आमच्याकडे प्रस्ताव मागितला, तेव्हा आम्ही ज्या २७ मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते, जिथे आम्ही संघटनात्मक ताकद उभी केली होती, त्या जागा त्यांना दिल्या. या जागांमधील काही जागा वाटाघाटी होऊ शकणाऱ्या आहेत, त्यासाठी आम्ही चर्चेला तयार आहोत," अशी भूमिका वंचितने घेतली आहे. त्यामुळे वंचित आघाडीला नेमक्या किती जागा द्यायच्या, याबाबत आता मविआच्या नेत्यांमध्ये विचारमंथन सुरू आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर या दोन्ही पक्षांचा एक गट सत्ताधारी महायुतीसोबत तर दुसरा गट विरोधकांच्या महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जागावाटपाचं गणित पूर्णपणे बदलेलं असून महाविकास आघाडीच्या जागावाटपात आपल्याकडे सर्वाधिक जागा खेचून आणण्यात सध्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला यश आल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीतून समोर आलेल्या नव्या प्रस्तावावर येत्या दोन दिवसांत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मविआ नेत्यांकडून जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबतची माहिती अद्याप अधिकृतरित्या देण्यात आलेली नसून लवकरच याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.