महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 06:26 AM2024-05-01T06:26:21+5:302024-05-01T06:26:36+5:30
दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव सेनेचे उमेदवार आहेत. दक्षिण-मध्य मुंबईत याच पक्षाचे उमेदवार अनिल देसाई हेही मराठी चेहरा आहेत.
मुंबई- महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांचे सर्व सहा उमेदवार मराठी असून या निमित्ताने उद्धव सेना-काँग्रेसने मराठी कार्ड खेळले आहे. त्याचा किती फायदा या आघाडीला होणार हे ४ जूनच्या निकालात दिसेल.
दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव सेनेचे उमेदवार आहेत. दक्षिण-मध्य मुंबईत याच पक्षाचे उमेदवार अनिल देसाई हेही मराठी चेहरा आहेत. उत्तर-मध्य मुंबईत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आ. वर्षा गायकवाड यांच्या रूपानेही मराठीच चेहरा देण्यात आला आहे. उत्तर मुंबईत काँग्रेसने भूषण पाटील हा मराठी माणूस उमेदवार म्हणून दिला आहे. उत्तर पश्चिम मुंबईचे उद्धव सेनेचे उमेदवार
भूषण पाटील यामिनी जाधव अमोल कीर्तीकर आणि उत्तर-पूर्व मुंबईतील उद्धव सेनेचे उमेदवार संजय दिना पाटील हेही मराठीच आहेत.
भाजपने तीन उमेदवारांपैकी एक हिंदी भाषिक (पीयूष गोयल उत्तर मुंबई), एक गुजराथी भाषिक (मिहीर कोटेचा उत्तर-पूर्व मुंबई) आणि एक मराठी भाषिक (अॅड. उज्ज्वल निकम उत्तर-मध्य मुंबई) असे उमेदवार दिले आहेत. शिंदेसेनेचे आ. रवींद्र वायकर (उत्तर-पश्चिम मुंबई), राहुल शेवाळे (दक्षिण-मध्य मुंबई) आणि आ. यामिनी जाधव (दक्षिण मुंबई) हे तिन्ही उमेदवार मराठी आहेत. महाविकास आघाडीने सहा मराठी तर भाजप-शिंदे सेनेने चार मराठी उमेदवार मैदानात उतरविले आहेत.
या निमित्ताने मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा उद्धव सेना आणि काँग्रेसचा प्रयत्न असेल. तर हिंदी, गुजराती भाषिकांना केवळ भाजपनेच संधी दिली हा मुद्दा पुढे करत बिगरमराठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजप-शिंदेसेनेचा प्रयत्न असेल. महायुतीत शिंदे सेनेला जास्तीत जास्त दोन जागा मिळतील असे म्हटले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबईची जागा आपल्या पक्षाकडे खेचून आणली आहे.