सोबत दिसणारी गर्दी नेमकी कुणाच्या पाठीशी?
By मनीषा म्हात्रे | Published: May 13, 2024 09:23 AM2024-05-13T09:23:46+5:302024-05-13T09:25:14+5:30
मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उत्तर पूर्वमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध मुलुंडचे विद्यमान आमदार मिहीर कोटेचा यांच्यात अटीतटीची लढत रंगली आहे. रॅलीवर दगडफेक, मराठी-गुजराती वाद आणि धार्मिक राजकारणाने मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांची चढाओढ चर्चेचा विषय ठरली. सलग दोनवेळा जास्तीच्या मताधिक्याने निवडून आलेल्या भाजपने विजयश्री कायम ठेवण्याचा चंग बांधला आहे. तर मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ राजकारणाच्या बदलत्या घडामोडींमध्ये त्यांच्या हातातून जनता दलाकडे गेला. त्यानंतर मात्र येथील मतदारांनी कधी शिवसेना-भाजप, तर कधी पुन्हा काँग्रेस असा संमिश्र कौल दिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीने दौलत खान तर बहुजन समाजवादी पक्षाने प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. दोघांच्या मतांचा पाटील यांच्या मतांवर परिणाम होईल, हे नाकारता येत नाही. मात्र, दुसरीकडे मतदारसंघातील कट्टर शिवसैनिक पाटील यांच्या सोबतीला असल्याने त्यांच्यासाठी ती जमेची बाजू ठरत आहे. गेल्या निवडणुकीत वंचितच्या निहारिका खोंदले यांनी ६८ हजार मते घेतली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कोटेचा यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक असून मतदारसंघातील मराठी-गुजराती वाद त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. मनसे फॅक्टर त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा ठरेल, हे निकालातून स्पष्ट होईल. सध्या सर्व मित्रपक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात उतरलेले आहेत. दोन्ही उमेदवारांच्या सोबत दिसणारी गर्दी आणि मतदारांचा कौल नेमका कुणाचा बाजूने झुकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मिहीर कोटेचा हे विकासक असून, मुलुंडचे विद्यमान आमदार आहेत. ते खासदारकीची निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहेत. १९९३ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरूवात केली. गेल्या ३१ वर्षांपासून ते भाजपसोबत जोडले गेले आहेत. भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्षही होते. त्यांच्या वडिलांच्या नावाने चंद्रकांत चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत सामाजिक कार्य सुरू आहे.
संजय पाटील हे भांडुपमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर २००४ मध्ये आमदार, त्यानंतर २००९ मध्ये उत्तर पूर्वचे खासदार म्हणून निवडून आले होते. २०१४ मध्ये पराभवानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेनेत प्रवेश केला. त्यांचे वडील दिना बामा पाटील हे माथाडी कामगारांचे मोठे नेते होते. पाटील यांच्या आई मनोरमा पाटील या नगरसेविका होत्या. आई-वडिलांचा सामाजिक वारसा ते पुढे नेत आहेत.
मराठी मतांसाठी रस्सीखेच...
मुलुंडपासून मानखुर्द-शिवाजीनगरपर्यंत परसरलेल्या या मतदारसंघात ७ लाखांहून अधिक मराठी मतदार आहेत. त्याखालोखाल दोन ते सव्वादोन लाख मुस्लिम मतदार आहेत. गोवंडी शिवाजीनगर भागात त्यांचे प्राबल्य जास्त आहे. तर जवळपास दोन लाख गुजराती मतदार, दीड लाख उत्तर भारतीय तसेच अन्य भाषिकांचा समावेश आहे. मतदारांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी मराठी मतदारांची संख्या अधिक असल्याने मराठी मतांच्या गणितांप्रमाणेच उमेदवारांनी प्रचाराची रणनीती ठरवली आहे.
गेल्या पाच निवडणुकांमध्ये काेणत्या पक्षाचा खासदार
१९९९ - किरीट सोमय्या, भाजप
२००४ - गुरूदास कामत, काँग्रेस
२००९ - संजय पाटील, राष्ट्रवादी
२०१४ - किरीट सोमय्या, भाजप
२०१९ - मनोज कोटक, भाजप
मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील आमदार कोण?
मुलुंड - मिहीर कोटेचा
भांडुप - रमेश कोरगावकर
विक्रोळी - सुनील राऊत
घाटकोपर पश्चिम - राम कदम
घाटकोपर पूर्व - पराग शहा
मानखुर्द - अबू आझमी