Join us

राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 4:58 AM

मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा मुंबईत होण्याची शक्यता आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी पार्कात सभेसाठी १७ मे रोजीसाठी मनसेने महापालिकेत अर्ज केला आहे. शिवतीर्थावर ही सभा घेऊन राज ठाकरे कोणाची पोरे कडेवर खेळवणार आहेत? कोणाच्या लग्नाच्या वरातीत राज ठाकरे आणि मनसे नाचणार आहे? असे म्हणत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी निशाणा साधला आहे.

मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा मुंबईत होण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेकडे १७ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मिळावे, यासाठी अर्ज करण्यात आला आहे. यावरून अनिल परब म्हणाले, राज ठाकरे यांनी इतरांची मुले कडेवर खेळवणार नाही, असे सांगितले होते. मग आता जर उमेदवार त्यांचा नाही, तर शिवतीर्थावर सभा कोणासाठी घेणार आहेत? ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, त्याच दिवशी आम्ही महापालिकेकडे शिवतीर्थ सभेसाठी मिळावे, यासाठी अर्ज केला आहे. सगळे रेकॉर्डवर आहे. आम्ही रस्त्यावर सभा घेणार नाही. आम्हाला आमची स्वतःची  २२  मुले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही शिवतीर्थावर सभा घेत आहोत. ज्यांना मुले नाहीत त्यांना कशाला हवी सभा असेही ते म्हणाले.

वायकर, जाधव यांच्या प्रचाराला सोमय्यांना स्टार प्रचारक करा

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी जाहीर झाली, त्यावरूनही अनिल परब यांनी खोचक टोमणा मारला आहे. ईडी चौकशीला सामोरे जाताना हा माणूस ढसाढसा रडत होते. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना आता मुंबईतून उमेदवारी मिळालीय. भाजपला विनंती आहे की, रवींद्र वायकर, यामिनी जाधव, राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला किरीट सोमय्या यांना स्टार प्रचारक करावं, अशी खोचक प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिलीय.

टॅग्स :राज ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४शिवसेना