यदु जोशी
मुंबई : मुंबईत एक मतदान केंद्र असे आहे जिथे तब्बल एकाच स्थळी ३४ मतदान केंद्र आहेत अन् २९,६२८ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. दुसरे एक ठिकाण आहे जिथे २७ मतदान केंद्र आहेत आणि मतदारांची संख्या आहे ३०,९२९. हा राज्यातील व कदाचित देशातीलही विक्रम आहे. एका छोट्या गावातील मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त ही मतदारसंख्या आहे. तेथे जास्तीत जास्त मतदान सुलभतेने कसे होईल, यासाठीची जय्यत तयारी निवडणूक आयोगाची यंत्रणा करीत आहे.
मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघातील धारावी ट्रान्झिट कॅम्प स्कूल किंवा धारावी पब्लिक स्कूल येथे ३४ केंद्र आणि २९,६२८ मतदार आहेत. तर उत्तर-पूर्व मतदारसंघात शिवाजीनगर महापालिका शाळा; चिखलवाडी येथे २७ मतदान केंद्र आणि ३०,९२९ मतदार आहेत. या केंद्रांवर २० मे रोजी मतदान होईल.
चार बाजूंना चार रंग
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांनी धारावी पब्लिक स्कूलमधील तयारीविषयी माहिती दिली. ही शाळा चौकोनी आहे आणि कोणत्या बाजूला कोणते मतदान केंद्र आहे, हे चटकन लक्षात यावे, यासाठी चार बाजूंना चार रंगांनी सजविण्यात आले आहे.
केंद्रांकडे जाणारे मार्गही त्याच रंगाचे असतील. मतदार चिठ्ठ्यादेखील त्याच रंगाच्या असतील. केंद्रावरील दिशादर्शक बाणही त्या-त्या रंगाचे असतील.
‘एनसीसी’ आणि ‘एनएसएस’चे १०० विद्यार्थी मतदारांना प्रत्यक्ष मतदानाच्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करतील. तिथे व्यवस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांचे टी-शर्टही त्याच रंगाचे असतील.
हिरकणी कक्ष, प्रतीक्षालयाचीही उभारणी
एकाच वेळी आठ-दहा गर्भवती महिला मतदानासाठी आल्या तर त्यांना उभे राहावे लागू नये, यासाठी हिरकणी कक्ष उभारला जात आहे. वैद्यकीय कक्ष, प्रथमोपचार, ॲम्ब्युलन्स आदी सुविधा असतील.
रांग असेल तर काही वेळ मतदारांना बसता यावे, यासाठी प्रतीक्षालयांची व्यवस्था असेल. सहमुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी यांनी अलीकडेच या ठिकाणी भेट दिली. शिवाजीनगर महापालिका शाळेतही अशीच जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.
महिला ‘स्लॉट’
महिला मतदारांची एकाच वेळी गर्दी होऊ नये, यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबविली जाणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आयोगासाठी काम करीत असलेले कर्मचारी, आरोग्य सेविका घरोघरी जाऊन कोणत्या वेळेला मतदानासाठी यायचे ते सांगत आहेत, त्यासाठी महिला मतदारांना ‘स्लॉट’ देण्यात येत आहेत. या प्रकारची व्यवस्थाही प्रथमच होत आहे.