मुंबई : मुंबईकर मतदारराजा उत्साहाने बाहेर पडला खरा; मात्र वाढती आर्द्रता आणि तापमानाने मतदारांचा घाम काढला. मतदान करण्यासाठी केंद्राबाहेर लागलेल्या रांगांनी मुंबईकरांना त्रास दिला असतानाच वाढत्या उकाड्याने मुंबईकरांचा जीव काढला. दुर्दैव म्हणजे मतदान केंद्रांवर खेळती हवा आणि पंख्यांची पुरेशी सोय नसल्याने मुंबईकरांनी ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानात मतदान केले. मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान ३४ ते ३५ अंशांच्या घरात राहील.
मात्र, आर्द्रता ५० ते ७० टक्क्यांच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयांनी व्यवस्थाही केली होती. हे नियोजन तोकडे पडले.
बहुतांशी मतदान केंद्रांवर अस्वच्छता होती. उष्णतेमुळे वेगाने फिरणारे आणि पुरेशी हवा देणारे पंखे हवे होते. मात्र, त्याची देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागला. दिवसभर ही अडचण सर्वत्र पाहावयास मिळाली.
या ठिकाणी पाऊस?
कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान कायम राहील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.