मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राजकीयदृष्ट्या बहुरंगी असलेल्या उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील (North East Mumbai Lok Sabha Constituency) आतापर्यंतच्या निवडणुका नेहमीच चुरशीच्या झाल्या आहेत. १५ लाखांहून अधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात सात लाखांहून अधिक मराठी मते आहेत. ही मते कोणाच्या निवडणूक चिन्हाचे बटन दाबतात यावर त्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळेच इच्छुकांनी या ठिकाणी आपापल्या परीने क्षेत्ररक्षण लावण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीत जनता पार्टी, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या खासदारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ नंतर जनता दलाकडे गेला. त्यानंतर मतदारांनी कधी सेना-भाजप, तर कधी पुन्हा काँग्रेस असा संमिश्र कौल दिला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपची विजयश्री कायम होती. यावेळी भाजपने खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करून आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, वंचित आघाडीकडूनही उमेदवारीसाठी लगबग सुरू आहे. मुलुंड आणि घाटकोपर पूर्व परिसर गुजरातीबहुल आहे. मराठी मतदारांचे पारडे कुणाच्या बाजूने झुकते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कुठे किती मतदार?
- मुलुंड- मानखुर्द-शिवाजीनगरपर्यंत पसरलेल्या उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम या भागात मराठी मतदार अधिक आहेत.
- मराठी मतदारांखालोखाल दोन ते सव्वादोन लाख मुस्लिम मतदार आहेत. गोवंडी शिवाजी नगर भागात त्यांचे प्रमाण जास्त आहे. जवळपास दोन लाख गुजराती, दीड लाख उत्तर भारतीय, २७ हजार ५५१ ख्रिश्चन, तर एक लाख ९९ हजार ७४४ अन्य भाषिकांचा समावेश आहे.
२०१९ मधील परिस्थिती
- मुलुंड, भांडूप पश्चिम, विक्रोळी, घाटकोपर, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द-शिवाजीनगर या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या मुलुंड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजेच ६३.६६ टक्के, तर मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांत कमी म्हणजेच ४७.८ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
- पूर्व येथे दुसऱ्या क्रमांकाचे ६१.२७ टक्के मतदान झाले. कोकणी मराठी मतदार असलेल्या भांडूप आणि विक्रोळीमध्ये अनुक्रमे ५८.९९ आणि ५७.३० टक्के मतदान झाले होते.