Join us

निवडणुकीचे टेन्शन संपले; प्रचार उरकून उमेदवार निघाले गावी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:15 AM

भर उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार करून थकलेले उमेदवार आता मतमोजणीचे टेन्शन दूर करण्यासाठी अनेक पर्याय शोधताना दिसत आहेत.

मुंबई : भर उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार करून थकलेले उमेदवार आता मतमोजणीचे टेन्शन दूर करण्यासाठी अनेक पर्याय शोधताना दिसत आहेत. त्यामध्ये काही उमेदवारांनी धार्मिक स्थळांना भेटी देणे सुरू केले असून काहींनी कुटुंबासह पर्यटनासाठी गावी  जाणे पसंत केले आहे. मात्र, त्याच्या बाहेर जाण्यावरूनही मतदारसंघात राजकारण सुरू आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान झाले आहे. या मतदानासाठी गेल्या दोन महिन्यापासून उमेदवार मतदारसंघात तळ ठोकून बसले होते. वाढत्या उकाड्याने अनेकांना उन्हाचा त्रास झाला होता. 

उपनगरातील चार लोकसभा मतदारसंघात ८७ उमेदवार आणि मुंबई शहर जिल्ह्यातील दोन मतदारसंघात २९ उमेदवार असे मुंबईत ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गोरेगाव, विक्रोळी आणि शिवडी येथील स्ट्राँगरूममध्ये ४ जूनपर्यंत या मतपेट्या त्रिस्तरीय सुरक्षेत ठेवण्यात आल्या आहेत.

१) ज्या ज्या मतदारसंघात स्थनिक मतदार वगळून बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. त्या मतदारसंघात निकालापूर्वीच अनेक चर्चा रंगल्या आहेत. जो उमेदवार निवडणूक होताच बाहेर पळतो तो निवडून आल्यावर काय काम करणार असे मुद्दे उपस्थित करीत मतदारांमध्ये राजकारण रंगले आहे. 

२) जे उमेदवार मुंबईचे आहेत. त्यांनी मतदानानंतर नागरिकांमध्ये राहणे पसंत केले आहे. शहरातील धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळांना भेटी देत मनावरचा ताण कमी करू पाहत आहेत.

३)  येत्या ४ जून निकालाच्या दिवसापर्यंत सर्वच उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. मनावरचा ताण कमी करण्यासाठी उमेदवार नानाविधी करत दिवस ढकलत आहेत. त्यात योगा करणे, मंदिरात जाणे, कुटुंबासमवेत समारंभात जाणे, गावी किंवा पर्यटनाला जाणे असे उपाय करताना उमेदवार आढळून येत आहेत.

प्रचार उरकून उमेदवार गावी-

मुंबईत कडक उन्हाळ्यात प्रचार उरकून काही उमेदवारांनी गावीही वाट धरली आहे. भरउन्हात प्रचार करून अनेकांना त्रास झाला आहे. निकालापर्यंत थोडा निवांतपणा म्हणून उमेदवार बाहेरगावी गेले आहेत. 

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४