मुंबई : पंखे, पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करणाऱ्या शेडचा अभाव अशा एक ना अनेक गैरसोयींत सोमवारी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी याचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसल्याचा पाहावयास मिळाला. मागाठाणे येथील शिंदेसेनेचे आ. प्रकाश सुर्वे यांचे मतदान केंद्र बोरीवली पश्चिमेला एमएचबी कॉलनी येथील सायली कॉलेजमध्ये होते. या केंद्रावर पुरेसे पंखेच नव्हते. त्यामुळे मतदारांसह कर्मचाऱ्यांनाही प्रचंड उकाड्याला तोंड द्यावे लागत होते. अखेर एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पंखे बसविण्यात आले. मतदारांना उन्हात उभे राहावे लागू नये म्हणून शेड बांधली होती.
प्रत्यक्ष मतदान केंद्रेही अशा पद्धतीने बंदिस्त करून टाकली होती, की हवा खेळती राहायला वाव नव्हता. अशा परिस्थितीत तासनतास रांगेत उभे राहून मतदारांनी मतदानाचा हक्क तरी कसा बजावायचा, अशी तक्रार प्रकाश सुर्वे यांनी केली. त्यात मतदानासाठी खूप वेळ लागत होता. आपल्याला पाऊण तास रांगेत उभे राहावे लागले, अशी माहिती त्यांनी दिली. मतदान केंद्रावरील अशा गैरसोयींनमुळे मतदानासाठी आलेल्या सामान्य मतदारांनाही नाहक त्रास झाला.
मतदान न करणाऱ्यांचा टॅक्स वाढवावा-
मतदान न करताच आपले सरकार हे करत नाही, ते करत नाही, असे केवळ म्हणाल, तर त्यासाठी मतदान न करणारेच जबाबदार राहतील. सरकार जबाबदार राहणार नाही. मतदान न करणाऱ्यांसाठी काही ना काही तरतूद असायला हवी. त्यांचा टॅक्स वाढवायला पाहिजे किंवा आणखी काही तरी करायला हवे.- परेश रावल, अभिनेते
मतदान प्रक्रिया संथ -
मुंबईच्या सहापैकी विशेषकरून उत्तर पूर्व मतदारसंघात मतदान प्रक्रिया अत्यंत संथ होती, अशी तक्रार ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केली. या मतदार संघात मतदान प्रक्रिया खूपच सावकाश होत होती. संबंधित अधिकाऱ्यांकडे आम्ही वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती. याबाबत आम्ही लेखी तक्रार केली आहे. अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचे सांगत मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.- सचिन अहिर, ठाकरे गट
निवडणूक आयोगाचे ढिसाळ नियोजन-
मतदारांमध्ये उत्साह असूनही ढिसाळ नियोजनामुळे या उत्साहावर पाणी फेरले गेले. सांताक्रूझ येथील मतदान केंद्रावर एका वर्गाच्या चिंचोळ्या जागेत चार बूथ होते. तिथे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तिथे फक्त दोन फॅन होते. मतदार घामाघूम झाले होते. अनेक नवमतदार रांगेतून परत जात होते. निवडणूक आयोगाने सर्व आस्थापनांतून निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देऊन काय मिळवले. - डॉ. दीपक सावंत, माजी आरोग्यमंत्री