Join us

धारावीतील मतदान केंद्र सजले रंगीबेरंगी पडद्यांनी; निवडणूक विभागाची अभिनव संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:08 AM

धारावीतील ट्रान्झिट कॅम्प भागातील मुंबई पब्लिक स्कूल शाळेत एकाच ठिकाणी सर्वाधिक अशी ३४ मतदान केंद्रे होती.

मुंबई : मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात धारावीतील ट्रान्झिट कॅम्प भागातील मुंबई पब्लिक स्कूल शाळेत एकाच ठिकाणी सर्वाधिक अशी ३४ मतदान केंद्रे होती. एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने मतदान केंद्रे असल्याने मतदारांचा गोंधळ उडू नये यासाठी रंगांची अभिनव संकल्पना निवडणूक विभागाने राबविली होती. लाल, जांभळा, आकाशी, हिरवा, गुलाबी अशा रंगछटांचे पदडे वापरून मतदान केंद्रे सजविण्यात आली होती. त्यातून या मतदान केंद्रांचा परिसरही आकर्षक बनून गेला होता. 

मुंबईत जागेच्या उपलब्धतेची मर्यादा असल्याने एकाच जागी अनेक मतदान केंद्रे उभारल्याचे नेहमीच दिसून येते. त्यामध्ये धारावीचा भाग दाटीवाटीने वसला असल्याने या भागात जागेची अडचण नेहमीच जाणवते. त्यातून धारावीत अनेक मतदान केंद्रांवर एकाहून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. त्यातील ट्रान्झिट कॅम्पमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये तब्बल ३४ मतदान केंद्रे होती. या ठिकाणी मतदानासाठी आल्यावर आपले मतदान केंद्र शोधताना मतदारांचा गोंधळ उडू नये यासाठी निवडणूक विभागाने विशेष खबरदारी घेतली होती. ठरावीक मतदान केंद्रांना एक विशिष्ट रंग या ठिकाणी देण्यात आला होता. तसेच या रंगाचे स्टीकर मतदारांच्या वोटर स्लिपवर चिकटविण्यात आले होते. मतदान केंद्र नक्की कुठे आहे हे समजावे यासाठी जागोजागी प्रत्येक मतदान केंद्राच्या रंगाची दिशादर्शक चिन्हे बसविण्यात आली होती. त्यातून मतदारांचा आपल्या मतदान केंद्रावर सहजरीत्या पोहोचता येत होते. 

मतदारांना मतदान केंद्र शोधणे सोपे व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने आणि पालिकेच्या अभियंत्यांनी ही अभिनव आणि कल्पक युक्ती वापरली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४धारावीमतदान