मुंबई : लोकसभा निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी मुंबई पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मुंबईत ११० फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कायद्यांतर्गत २ हजार १५४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. या आरोपींकडून लेखी करारपत्र घेत त्यांना योग्य ती समजही देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी जानेवारी ते ३० एप्रिलदरम्यान ही कारवाई केली आहे. पोलिसांनी सीआरपीसी १०७ अंतर्गत सर्वाधिक म्हणजे ६ हजार २०१, तर सीआरपीसी १५१ (३) अंतर्गत ९१६ कारवाया केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ५३ जणांना अजामीनपात्र वाॅरंट बजावले आहे. मुंबईतून तडीपार केलेले मात्र विनापरवाना पुन्हा शहरात आलेल्या ६२ जणांची धरपकड करत त्यांच्यावर कारवाई केली आहे.
महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम १२०, १२२, १३५ व १४२ अन्वये संशयितरीत्या वावरणाऱ्या १७५ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याशिवाय एमपीडीए कायद्यांतर्गत सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध दारूविक्री, अवैध व्यवसायावर २४ ठिकाणी छापे टाकून ३० जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
२,७९२ चोरीच्या घटनांची नोंद-
१) जानेवारी ते मार्चदरम्यान मुंबईत एकूण १४ हजार ३९२ गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांच्या दप्तरी झाली आहे. यामध्ये चोरीच्या सर्वाधिक २ हजार ७९२ घटना घडल्या आहेत. मार्चमध्ये याचे प्रमाण ९४० होते. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.