Pm Narendra Modi ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी लोकमत समूहाला विशेष मुलाखत दिली. लोकमत समूहाचे सह-व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी पंतप्रधानांना अनेक मुद्द्यांवर बोलते केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही मुलाखत पार पडली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत भाष्य केले आहे.
या मुलाखतीत सध्या प्रचारात भाजपचा प्रमुख मुद्दा असलेल्या विकसित भारत, रोजगाराचे प्रश्न, सरकारच्या प्राधान्यक्रमावर महाराष्ट्राचे असलेले स्थान, पवार कुटुंबात पडलेली फूट, उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का, एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपसोबत का आले, अशा अनेक कळीच्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांना बोलते केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज ठाकरे यांच्याबाबतीत प्रश्न विचारण्यात आला.
लोकांच्या मनात प्रश्न आहे की, भाजपला विजयाची एवढी खात्री होती तरी त्यांनी राज ठाकरे यांना सोबत का घेतले?
पंतप्रधान मोदी म्हणाले, मी आधीच सांगितल्याप्रमाणे देशाला जो सर्वोच्च प्राधान्य देतो, त्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. गेल्या १० वर्षांपासून आम्ही स्वबळावर बहुमतात आहोत. मात्र, तरीही आम्ही कायमच नव्या मित्रांचे स्वागत केले आहे. आपल्या लोकशाहीसाठी हे चांगले आहे. अधिकाधिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करणे केव्हाही चांगलेच असते.
"राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत. त्यांनी यापूर्वीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही देशासाठी चांगले काम केले आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. आमच्या विचारांना तसेच आमच्या द्रष्टेपणाला ते पाठिंबा देतात. महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील, असे आम्हाला वाटते. त्यामुळे हे एकत्र येणे केवळ सत्तेसाठी किंवा राजकीय गणितांसाठी आहे, असे नाही. लोकसेवेसाठी एकत्र येणे, हा त्यामागचा उद्देश आहे. वस्तुत: देशहितासाठी जो कोणी आमच्याकडे येईल, त्या प्रत्येकाचे आम्ही सहर्ष स्वागतच करू, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला
लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. हा पाठिंबा बिनशर्त असून तो फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. या भूमिकेवरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, राज आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी महायुतीच्या काही उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या आहेत. मुंबईत १७ मे रोजी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभाही होणार आहे.