मुंबई-
मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील उमेदवारीवरुन महायुतीतला तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे मुंबई-उत्तर पश्चिममध्येही उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर मशाल चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार रविंद्र वायकर धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढणार आहेत.
मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघात उमेदवारीवरुन बराच खल सुरू होता. या मतदार संघासाठी अभिनेता गोविंदासह अनेक नावं चर्चेत होती. अखेर काल रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी वायकरांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुरुवातीला रविंद्र वायकर खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत होतं. तसंच वायकर यांच्या नावाला मित्रपक्षातून विरोध होत असल्याचीही चर्चा होती.
दुसरीकडे ठाकरे गटानं अमोल किर्तीकर यांना याआधीच उमेदवारी जाहीर केली आहे. अमोल किर्तीकर यांच्याकडून प्रचारालाही याआधीच सुरुवात झाली आहे. रविंद्र वायकर हे जोगेश्वरी विधानसभेचे आमदार आहेत. या क्षेत्रात वायकरांचं वर्चस्व असल्याचं मानलं जातं. त्यामुळे आता रविंद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर अशी लढत याठिकाणी पाहायला मिळणार आहे.