Sanjay Raut On Raj Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. तर पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहेत. काल महायुतीची ठाण्यात प्रचारसभा झाली. या सभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेही उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या टीकेला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
"राज ठाकरे हे सुपारी बाज आहेत ही पहिली गर्जना भाजपाने केली होती आम्ही नाही. राज ठाकरे सुपाऱ्या घेऊन पाठिंबा देतात आम्ही कधीच म्हणालो नाही. हे देवेंद्र फडणवीस म्हणतात, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला.
"देवेंद्र फडणवीस यांना जर विस्मरण झाले असेल आणि ते नरेंद्र मोदी यांच्या सभेत सुपारी बांधून बसणार असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे. पण राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष सुपारी घेतो आणि पाठिंबा देऊन प्रचार करतो हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हे फडणवीस यांना विचारा, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप
महाराष्ट्रातल्या ज्या भागात आज निवडणुका आहेत, संभाजीनगर असेल महत्त्वाचा पुणे आहे इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचे वाटप, पैशाची आवक जावक ही स्पष्ट दिसत आहे. धंगेकर जे पुण्याचे उमेदवार आहेत ते पोलीस स्टेशन समोर धरणे धरून बसले होते. पोलिसांच्या मदतीने पैशाचे वाटप होत आहे. नरेंद्र मोदींनी जरा बघा, नुसते ज्ञान देऊ नका फडणवीस गृहमंत्री आपण जरा पाहा. नगरमध्ये खुल्या पैसे वाटताना लोकांनी पकडले आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
नाशिकमधला मुख्यमंत्री यांच्या आगमनाचा एक व्हिडिओ मी ट्विट केला. दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत. 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या. त्या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटत गेले, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकर देत आहोत, असे राऊत यांनी जाहीर केले.