Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसमधीलअजित पवार यांच्यासह नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे पक्षात उभी फूट पडली. यानंतर शरद पवार भाजपासोबत येण्यासाठी ५० टक्के तयार होते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. या दाव्याला देवेंद्र फडणवीस यांनीही दुजोरा दिला होता. तर केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत चर्चा करायला शरद पवारांनीच सांगितले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता. यावर आता स्वत: शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'भाजपासोबत जाण्याबाबतीत त्यावेळी चर्चा झाल्याचं' विधान खासदार शरद पवार यांनी'लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
"भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा हजारवेळी झाली असेल, राजकारणात चर्चा होत असतात. वेगवेगळ्या निर्णयावर होत असतात, वेगवेगळ्या धोरणावर होतात. प्रश्न आहे की अंतिम निर्णय काय? अंतिम निर्णय आहे की, भाजपाबरोबर नाही हा आहे, असं विधान खासदार शरद पवार यांनी केले.
'देवेंद्र फडणवीसांना 'त्या' प्रकरणात अटकेची भीती वाटत होती', संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
'भाजपाबरोबर जाण्यासाठी आमच्यातील काही लोकांनी चर्चा केली. काही लोक त्यांच्यासोबत गेले. त्यांना वाटतं जाण हिताच आहे, आम्हाला वाटतं जाण हिताच नाही. राजकारणात सुसंवाद ठेवला पाहिजे, सुसंवाद ठेऊन त्याच्यातून निष्कर्ष वेगवेगळे निघत असेल तर त्या निष्कर्षाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, भाजपा आणि आमची विचारधारा वेगळी आहे हाच आमचा निष्कर्ष होता. त्यामुळे चर्चा झाली आणि त्या चर्चेत दोन मत झाली, असंही शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला
राजकारणात चेहरा असला पाहिजे असं काही नसतं, शेवटी कार्यक्रम तयार करायचा असतो, असंही पवार म्हणाले. पीएम नरेंद्र मोदी यांच्या ४०० पार नारावर शरद पवार म्हणाले, माझ थोडं गणित कच्च आहे, त्यांनी ५४४ म्हणायला हवं होतं.
...म्हणून जाहीर माफी मागितली
काल अमरावतीमध्ये सभेच्या आधी खासदार शरद पवार यांनी अमरावतीकरांची माफी मागितली. माफी का मागितली या मागचे कारण पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले, अमरावतीचे सध्याचे खासदार आहेत त्यांना २०१९ मध्ये पाठिंबा दिला. त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही जाहीर सभा घेऊन समर्थन दिलं. त्यांना निवडून दिलं, निवडणून आल्यानंतर त्या लगेच भाजपा सरकारबरोबर बसल्या. भाजपाच्या विरोधातील मत घेऊन त्या निवडून आल्या. पण, त्यांनी पुन्हा भाजपाला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय चुकीचा होता. आमच्याकडून गेल्यावेळी लोकांची फसवणूक झाली. राजकारणात चूक झाली तर कबुल केली पाहिजे. या चुकीसाठी आम्ही दिलगीरी व्यक्त केली, असंही शरद पवार म्हणाले.