Shiv Sena MNS ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहेत. महायुतीने मुंबईतील उमेदवार अजूनही जाहीर केलेले नाही. दरम्यान, मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी उमेदवारीवरुन शिंदे गटावर टीका केली. या टीकेला आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे, तसेच मस्के यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली.
मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करुन उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील उमेदवारीवरुन शिंदे गटावर टीका केली होती. "मनसेला 'धनुष्य बाण'चिन्हावर लढायला सांगणार्यावर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे", असं ट्विट शालिनी ठाकरे यांनी केलं होतं.
'संजय निरुपम, रवींद्र वायकर सारख्यांना पाठिंबा गृहीत धरू नका'; मनसेचा एकनाथ शिंदेंना इशारा
शालिनी ठाकरे यांच्या ट्विटला शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिले. नरेश मस्के म्हणाले, शालिनी ठाकरे यांचे मत म्हणजे काही पक्षाच मत नाही. शिवसेनेला दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, शिवसेनेत सामील होत आहेत, त्यामुळे त्यांना दोष देता येत नाही. आणि आमचा पक्ष कसा चालवायचा, संजय निरुपम यांना अजूनही आम्ही प्रवेश दिलेला नाही, असंही मस्के म्हणाले.
"पक्षात प्रवेश कोणाला द्यायचा, कोणाला द्यायचा नाही. कोणाला उमेदवारी द्यायचा, कोणाला नाही, हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यामुळे शालिनी ठाकरे यांचा गैरसमज झाला असेल त्यांनी तो दूर करावा, असंही मस्के म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना तो पक्षाच्या ध्येयधोरणाशी बांधील आहे. संजय निरुपम पूर्वी खासदार होते, ते पूर्वी शिवसेनेत होते. तर रविंद्र वायकर हे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांच्यावर अजूनही गुन्हा सिद्ध झालेला नाही. आमच्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत.त्यामुळे त्यांच्यावर बोलताना आपण बोलताना योग्य ती काळझी घ्यावी, अशी विनंतीही शालिनीताई ठाकरे यांना मस्के यांनी केली.
आदित्य ठाकरेंवर टीका
आदित्य ठाकरे यांच्या टीकेवरही मस्के यांनी पलटवार केला. मस्के म्हणाले, कॅशने भरलेलं गोडाऊन हे शिंदे साहेबांचे का सापडेल, मुंबई महापालिकेतील जी काही कॅश आहे साडे तीनशे रुपयांची बॅग विकली, पैशांचं गोडाऊन ठाकरेंचेच असतील.