Join us

शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात डावे पक्ष आघाडीवर; संविधानासाठी आक्रमक प्रचाराचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:56 AM

मुंबईत एकमेकांचे वर्षांनुवर्षे विरोधक असलेले डावे पक्ष आणि उद्धवसेना आता एकाच व्यासपीठावर येत आहेत.

मुंबई : मुंबईत एकमेकांचे वर्षांनुवर्षे विरोधक असलेले डावे पक्ष आणि उद्धवसेना आता एकाच व्यासपीठावर येत आहेत. त्यांना विविध सामाजिक संघटनांची मदतही मिळत आहे. त्यांची संयुक्त बैठक नुकतीच शिवसेना भवनात पार पडली. त्यामध्ये संविधान आणि संसदीय लोकशाहीवरील हल्ला, त्याचबरोबर राज्यातील प्रमुख पक्ष फोडण्याच्या कृतीविरोधात जनतेत जाऊन प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत १९७० च्या दशकात असलेले डाव्या पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी पूर्वीच्या शिवसेनेने प्रयत्न केले. त्यातून मुंबईवरील डाव्या पक्षांचे वर्चस्व मोडीत निघाले. तसेच, कामगार वर्गावर शिवसेनेने पकड मिळविली. मात्र, बदललेल्या परिस्थितीत शिवसेनेत फुट पडली आहे. आता उद्धवसेना इंडिया आघाडीत सामील झाली असून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. तर, डावे पक्षही इंडिया आघाडीचा भाग आहेत. 

उद्धवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीतील शरद पवार गट, काँग्रेस, डावे पक्ष, आंबेडकरी संघटना आणि सामाजिक संघटनांची ‘संविधान बचाव’ समन्वय सभा शिवसेना भवनात नुकतीच घेण्यात आली.  सभेला काँग्रेस नेते हुसेन दलवाई,  माजी आमदार विद्या चव्हाण, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य अशोक ढवळे यांच्यासह अर्जुन डांगळे, सुधाकर सुराडकर, भालचंद्र मुणगेकर, श्याम गायकवाड, विश्वास उटगी आदी विविध मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४उद्धव ठाकरे