Join us

शिंदे सेनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजपला हवी उत्तर पश्चिम मुंबईची जागा

By मनोहर कुंभेजकर | Published: April 03, 2024 5:54 PM

Lok sabha election 2024 : अबकी बार चारसो पार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन आहे.त्यामुळे हा आकडा पार करण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एक एक जागा जिंकणे भाजपा साठी महत्वाचे आहे.

मुंबई-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्धव सेनेचे उमेदवार म्हणून उपनेते अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहिर केले. मात्र महायुतीत ही जागा भाजप का शिंदे सेना लढणार यावर अजून निर्णय झाला नाही.

अबकी बार चारसो पार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन आहे.त्यामुळे हा आकडा पार करण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एक एक जागा जिंकणे भाजपा साठी महत्वाचे आहे. शिंदे सेनेकडे येथून कडवी लढत देणारा सक्षम उमेदवार त्यांच्या कडे नसल्याने ही जागाभाजपालाच मिळाली पाहिजे अशी ठाम भूमिका 2002 पासून पालिकेत चार टर्म भाजपचे नगरसेवकपद भूषवणाऱ्या उज्वला मोडक यांनी लोकमतकडे विषद केली.

या मतदार संघात अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमित साटम आणि अन्य सक्षम उमेदवार भाजपकडे आहेत.त्यामुळे ही जागा भाजपला मिळाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात, शिवसेना, शिंदे सेनेकडून जोगेश्वरीचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या सोमवारी दुपारी  वायकर यांच्याशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली होती.मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी वायकर यांना उमेदवारी द्यायचा निर्णय घेतल्याचे कळताच जोगेश्वरी मधील भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले.त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत,आम्ही वायकर यांना निवडणुकीत मदत करणार नाहीं,त्यांच्या विरोधी प्रचार करू अशी ठाम भूमिका घेतली.

आम्ही जनतेत जाऊन काय प्रचार करायचा? आमचा उमेदवार ई. डी. घोटाळ्यात आहे, त्याला मतदान करा म्हणून सांगायचे का? रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही जाहीरपणे त्यांचा विरोध करू,आम्ही त्यांचा प्रचारच करणार नाही असे मोडक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४मुंबईभाजपाराजकारण