...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:57 PM2024-05-14T13:57:23+5:302024-05-14T14:00:24+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला होता. दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या या विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवार यांना पुन्हा डिवचले आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला होता. दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या या विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना पुन्हा डिवचले आहे. कदाचित लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसला अधिकृत विरोधी पक्षाचा दर्जा मिळण्याइतपतही जागा मिळणार नाहीत, त्यामुळे सर्व लहान पक्षांचं विलिनीकरण करून मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असावेत, असा टोलला नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे.
एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी केलेल्या विलिनिकरणाबाबत केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी म्हणाले की, शरद पवार यांनी हे विधान बारामतीमधील मतदान आटोपल्यानंतर केलं आहे. जर शरद पवार हे असं काही बोलत असतीत तर त्याचं काही ना काही महत्त्व असेलच. माझ्या मते यावेळीही काँग्रेसला मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचा दर्जा मिळणार नाही हे शरद पवार यांना कळून चुकलं आहे. अशा परिस्थितीत छोट्या छोट्या पक्षांचं विलिनीकरण झालं तर कदाचित विरोधी पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक आकडा गोळा होईल. त्यामुळेच मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचा दर्जा मिळवण्याठी विलिनीकरणाची चाचपणी केली जात आहे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एका प्रचारसभेला संबोधित करताना विलिनीकरणावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यापेक्षा त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावं, असा सल्ला दिला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दिलेली ही ऑफर शरद पवार यांनी फेटाळून लावली होती. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत कधीही जाणार नाही, असे शरद पवार म्हणाले होते.