Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची राज्यात प्रचार सुरू आहे. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात सभा घेतली. यावेळी ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरेंनी यावेळी पक्ष फोडीवरुन उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते. या टीकेला आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'आमचे सहा नगरसेवक फोडले' असं सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "जो माणूस मिनिटा मिनिटांना भूमिका बदलतो. आणि ते काय म्हणाले, आमचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंनी फोडले.तुमचे सहा नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले आठवतं का? राम कदम, प्रवीण दरेकर कुठे गेले? भाजपामध्ये गेले, ते जेव्हा भाजपामध्ये गेल्यानंतर तुमच्या तोंडामध्ये तेव्हा दात नव्हते का? तुम्ही त्यावेळी भाजपाला का विचारले नाही?, असा टोलाही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना लगावला. तिकडे पुण्यात रुपाली ठोंबरे, वसंत मोरे कुणी फोडले, कुणाच्या नावावर गेले? राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असेल मी नाही घाबरत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
राज ठाकरेंची उद्धव ठाकरे, सुषमा अंधारेंवर टीका
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्ह एकदा 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत, आता उद्धव ठाकरे यांना निशाण्यावर घेतले आहे. यावेळी राज यांनी थेट शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ दाखवत, 'तुम्ही म्हणताना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले, त्या वडीलांबद्दल एवढं प्रेम आहे. मग, बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता? तुम्ही तुमच्या पक्षाचा नेता करता? आणि तुमच्या वडलांवर प्रेम आहे म्हणून सांगता?" अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी ठाण्यातील सभेतून जहरी टीका केली.