Join us

वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 7:12 AM

उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप यांनी रॅलीकडे पाठ फिरवली.

मुंबई: मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरला. गायकवाड यांच्या रॅलीनिमित्त वांद्रे येथे प्रथमच उद्धवसेना काँग्रेससाठी एकत्र आली होती. त्याचबरोबर आघाडीतील शरद पवार गट, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप यांनी रॅलीकडे पाठ फिरवली.

दुपारी २ वाजता गायकवाड, माजी खासदार प्रिया दत्त, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, माजी खासदार हुसेन दलवाई, अशोक जाधव, बलदेव खोसा, आपचे रूबल रिचर्ड, सपाचे जिल्हाध्यक्ष हरून रशीद, शरद पवार गटाचे मिलिंद कांबळे, उद्धवसेना विभागप्रमुख महेश पेडणेकर यांच्या उपस्थित शक्तिप्रदर्शन करत खेरवाडी ते वांद्रे जिल्हाधिकारी अशी रॅली निघाली. 

त्यानंतर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलीला येण्यापूर्वी गायकवाड यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच, माहीम दर्गा, माहीम चर्च येथेही प्रार्थना केली. उमेदवारीसाठी स्पर्धेत असलेले खान, जगताप यांचा पत्ता कापला गेल्याने ते नाराज आहेत. खान यांनी स्टार प्रचार पदाचाही राजीनामा दिला आहे. गायकवाड यांनी त्यांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण उमेदवारी अर्ज दाखल करताना या दोघांनी रॅलीपासून दूर राहणे पसंत केले.

टॅग्स :वर्षा गायकवाडलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४काँग्रेस