यदु जोशी
मुंबई : महायुतीमधील भाजप-शिंदेसेनेने एकूण १२ विद्यमान लोकसभा सदस्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली आहे. आता त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे करायचे हा मोठा प्रश्न या दोन्ही पक्षांसमोर असेल. तिकिटे नाकारलेल्यांची संख्या मोठी आणि नजीकच्या भविष्यात असलेली पुनर्वसनाची संधी कमी असल्याने काहीजणांचे पुनर्वसन रखडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जूनमध्ये विधान परिषदेच्या ११ सदस्यांची निवडणूक होणार आहे. विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवावयाच्या या जागा आहेत. खासदारकीचे तिकीट नाकारलेल्यांपैकी काही जणांना विधान परिषदेवर पाठविले जाऊ शकते; पण एकप्रकारे ती पदावनती असेल आणि ती खासदारकी गमावलेल्यांना मान्य असेल का हाही प्रश्न आहे. हे सन्मानजनक पुनर्वसन नाही, असा सूर लावला जाऊ शकतो.
संधी देताना असेल कसोटी
भाजपचा विचार करता जळगावचे खासदार उन्मेष पाटील आता उद्धवसेनेत गेले आहेत. संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप अकोला मतदारसंघात उमेदवार होते. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे या बीडमधून लढत आहेत.
ज्यांना संधी नाकारली त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत; पण प्रत्यक्ष संधी देताना कसोटी लागेल.
१४ आमदार लढताहेत लोकसभा
राज्यातील विधानसभेचे १३ आणि विधान परिषदेचे एक आमदार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातील नीलेश लंके यांनी राजीनामा दिला आहे.
आमदारांपैकी सर्वात शेवटी उमेदवारी मिळाली ती भायखळा, मुंबईच्या शिंदेसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांना. त्या दक्षिण मुंबईत लढत आहेत.
त्यांच्याशिवाय, सुधीर मुनगंटीवार, संदीपान भुमरे, वर्षा गायकवाड, विकास ठाकरे, प्रतिभा धानोरकर, राजू पारवे, बळवंत वानखेडे, रवींद्र धंगेकर, मिहीर कोटेचा, प्रणिती शिंदे, राम सातपुते हे विधानसभा सदस्य, तर शशिकांत शिंदे हे विधान परिषद सदस्य लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत.
काय असू शकतात पर्याय?
राज्यसभेच्या तीन जागा भरल्या जाऊ शकतात. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मुंबई उत्तरमधून लढत आहेत, ते राज्यसभा सदस्य आहेत. ते लोकसभेला जिंकले तर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होईल; पण ती भाजपला मिळेल, हे स्पष्ट आहे.
अन्य दोन जागांवर अजित पवार गटाने हक्क सांगितला आहे. त्यामुळे शिंदेसेनेने संधी नाकारलेले भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), कृपाल तुमाने (रामटेक), राजेंद्र गावित (पालघर), हेमंत पाटील (हिंगोली) आणि गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर-पश्चिम) यांना प्रतीक्षा करावी लागू शकते.
हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यवतमाळ-वाशिममध्ये जिंकल्यास त्यांच्या घरात खासदारकी राहील.
लोकसभेला मुकलेल्यांपैकी काहींना सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे.
मोठ्या महामंडळाचे अध्यक्षपद हा एक पर्याय दिला जाऊ शकतो.
अजित पवार गटाचे ‘ॲडव्हान्स बुकिंग’
प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली एक राज्यसभा जागा आणि उदयनराजे भोसले सातारमधून जिंकले तर त्यांची रिक्त होणारी राज्यसभा जागा अशा दोन्हींचे ‘ॲडव्हान्स बुकिंग’ अजित पवार गटाने आधीच केले आहे.
उदयनराजे लोकसभेला निवडून गेले तर त्यांच्या राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या जागी आपल्या गटाच्या सातारमधील नेत्यालाच राज्यसभेची संधी मिळेल, असे अजित पवार यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते.