Join us

भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर

By मनीषा म्हात्रे | Published: April 28, 2024 3:51 PM

Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शनिवारी रात्री उशिराने भांडुप सोनापुर येथून सेक्युर कंपनीची व्हॅन पकडली. व्हॅनमध्ये तीन कोटींची रोकड असल्याचे समोर आले.

मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त केली. याबाबत चौकशी सुरू असतानाच भांडुपमधून शनिवारी रात्री उशिराने सव्वा दोन कोटींची रोकड निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही रक्कम बँकेची असून ती एटीएममध्ये भरण्यासाठी घेवून जात असल्याचे समोर आले. याबाबत आयकर विभाग अधिक चौकशी करत आहे. 

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शनिवारी रात्री उशिराने भांडुप सोनापुर येथून सेक्युर कंपनीची व्हॅन पकडली. व्हॅनमध्ये तीन कोटींची रोकड असल्याचे समोर आले. मात्र, सुरक्षा तसेच कागदपत्रांची कमतरता असल्याने भरारी पथकाला संशय आला.

तपासात ही गाडी रोज एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी घाटकोपर, मानखुर्द पर्यंत जात असते. त्यात एकूण २ कोटी २५ लाख ३ हजार रुपये ७०० रुपयांची रोकड मिळून आली. आतापर्यंतच्या तपासत ही बँकेचीच अधिकृत रक्कम असल्याचे आढळले आहे. आयकर विभाग, पोलीस यांच्याकडून पडताळणी सुरू आहे. 

ती रक्कम बँकेचीच

भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात ती रक्कम बँकेची असल्याचे समोर आले आहे.       

आतापर्यंत ९३ लाख ताब्यात...

उत्तर पूर्व मुंबईत आचारसंहिता जारी केल्यापासून यापूर्वी ९३ लाख ३७ हजारांची रोकड जप्त केली होती मुलुंड, घाटकोपर आणि मानखुर्द भागातून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चार गुन्हे नोंदवत आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे. यामध्ये मुलुंडमधून १६ लाख ९८ हजार, घाटकोपर मधून ७२ लाख ३९ हजार ६७५ आणि मानखुर्द मधून अडीच आणि दीड लाखांची अशी एकूण ९३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

 

टॅग्स :पैसामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई उत्तर पूर्व