मुंबई : भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांना संधी नाकारण्यात आली. आता निकम यांचा सामना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी होईल.
या मतदारसंघासाठी त्यांचे, तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, अभिनेत्री माधुरी दीक्षित अशी नावे चर्चेत होती. पूनम महाजन यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले नाही, तेव्हापासूनच त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही असे बोलले जात होते. भाजपने पूनम यांच्या जागी अन्य पर्यायांवर विचार केला. विलंबाचे एक कारण हेही होते, की आधी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होऊ द्या, मग आपण उमेदवारी जाहीर करू, असे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना सुचविले होते. वर्षा गायकवाड यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केल्यानंतर शनिवारी भाजपने निकम यांच्या नावाची घोषणा केली.
संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडली
■ उज्वल निकम हे मूळचे जळगावचे आहेत. १९९३ मधील बॉम्बस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या न्यायालयीन प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिल्याने देशभर त्यांचे नाव चर्चेत आले.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या बलात्कार व खून खटल्यातही ते विशेष सरकारी वकील होते. अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये त्यांनी सरकारची बाजू मांडली.
■ त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. निकम यांना उमेदवारी मिळणार, याबाबतचे भाकीत लोकमतने यापूर्वीच केले होते.
एन्ट्रीलाच मुरलेल्या महिला नेत्याशी सामना
उज्ज्वल निकम यांचे राजकारणात हे पहिलेच पाऊल आहे. राजकारणात अननुभवी असलेले उज्ज्वल निकम विरुद्ध मुरलेल्या राजकारणी असलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यातील सामना आता उत्तर-मध्य मुंबईत रंगणार आहे. त्यांचे पुतणे रोहित यांचे भाजपकडून जळगावमध्ये नाव चर्चेत होते.
आशिष शेलार यांच्यावरील संकट टळले
१ उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील भाजपचा उमेदवार शोध अॅड. उज्ज्वल निकम यांच्या रूपाने संपला आणि त्याचेवळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यावरील उमेदवारीचे संकट टळले. त्यासाठी त्यांनी स्वतःच मोठी धडपड केली होती, असे म्हटले जाते. शेलार यांची लोकसभा लढण्याची तयारी नव्हती आणि तसे त्यांनी पक्षाला कळविलेदेखील होते. तरीही त्यांना लढविले जाईल, अशी चर्चा होती.
पूनम महाजन यांना सक्षम पर्याय द्यायचा तर शेलार यांच्याशिवाय पर्याय नाही असा तर्क लढविला जात होता. आमदारकी आणि भविष्यातील राज्यात मंत्री होण्याची आशा सोडून दिल्लीला जाण्याची अनेकांची तयारी नसते. शेलार यांचीही दिल्ली इतक्या लवकर गाठण्याची इच्छा नव्हती, असे म्हटले जाते.
पूनम महाजन यांचे भवितव्य आता काय असेल?
• गेले अनेक दिवस ज्यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता होती त्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर भाजप नेतृत्वाने कापला. दोन वेळा उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार राहिलेल्या पूनम यांची हॅट्ट्रिक करण्याची संधी त्यामुळे हुकली आहे.
• भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या असलेल्या पूनम यांना राजकीय भवितव्य काय असेल हे अद्याप स्पष्ठ नाही. २०१६ ते २०२० या काळात त्या भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या. महाजन-मुंडे या दोन दिग्गज नेत्यांनी भाजपला महाराष्ट्रात वाढविले.
• मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आहेत. बहीण प्रीतम यांना पक्षाने संधी नाकारली आणि पंकजा यांना उमेदवारी दिली आहे. पूनम या पंकजा मुंडे यांची आतेबहीण आहेत.