Varsha Gaikwad : महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकांसाठी ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली. मुंबईतील जागावाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. जागावाटपावरुन मुंबई काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी दिल्लीला नाराजी कळवली असल्याचे बोलले जात आहे. नाराजीनाट्यावर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
"मी सर्वांना भेटत होते, मी कुठेही नॉटरिचेबल नव्हते. पक्षाला मी माझी बाजू सांगितली आहे, मुंबईत आम्हाला तीन जागा हव्या असं माझं मत होतं. यासाठी आमच्याकडे उमेदवारही होते. आम्ही आमचं मत ठेवलं, त्यांनी त्यांचं मत ठेवलं. घोसाळकर यांच्या कुटुंबाचा मला आदर आहे, ते लढू शकतात, मलाही वाटतं मी दक्षिण मुंबईमधून लढू शकते. मी माझ्यासाठी नाही तर पक्ष संघटना म्हणून भांडत आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
"देशातील संविधानाला वाचवायचे असेल तर एकत्र येऊन लढले पाहिजे, यासाठी आम्ही आघाडी केली. त्यामुळे एकदा पक्षाने निर्णय घेतला की आपण काय बोलू शकतो. महिलांना पुढं करण्यासाठी प्रियांका गांधींनी काम केलं आहे, मी पक्षाच्या संघटनेसाठी भांडत आहे. येणाऱ्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
महाविकास आघाडीत नाराजीनाट्य
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या घोषणेनंतर नाराज वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसचे सचिव के.सी वेणुगोपाल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं कळतं. मुंबईत काँग्रेसला २ जागा सोडल्यात त्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबईचा समावेश आहे. दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. या जागेवर वर्षा गायकवाड इच्छुक होत्या. या ठिकाणी एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे माजी खासदार राहिले आहेत. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई ही जागा काँग्रेससाठी अनुकूल होती. मात्र ती जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्यानं नाराजी वाढली आहे.