Join us

मुंबई कोणाची? ९९ लाख ३८ हजार मतदार निवडणार सहा खासदार; प्रशासनाची जय्यत तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 9:42 AM

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होत असून, त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तर महाविकास आघाडीतर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी बड्या नेत्यांनी मुंबईचे मुलुख मैदान गाजविले. मुंबईच्या राजकीय आखाड्यात माजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासारखे दिग्गज असून, मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण ९९ लाख ३८ हजार ६२१ मतदार २० मे रोजी आपल्या मतांचे दान कोणाला देणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांतील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. महायुतीने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून ॲड. उज्ज्वल निकम यांना दिलेली उमेदवारी केंद्रस्थानी आहे. दक्षिण मध्य मतदारसंघात आघाडीकडून अनिल देसाई यांची ताकद पणाला लागली आहे. उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत दाखल झालेले आमदार रवींद्र वायकर यांची प्रतिष्ठा मुंबई उत्तर पश्चिमेत पणाला लागली आहे. 

मुंबई दक्षिणमध्ये खासदार अरविंद सावंत आपले तख्त राखणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मुंबई उत्तर पूर्वमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वादानंतर मिहीर कोटेचा की संजय दिना पाटील? हा सामना आणखीच रंगला आहे. 

मतदान केंद्रांवर काय असतील सुविधा?

मतदान केंद्रांवर उन्हाळा, वळिवाच्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. वॉटरप्रूफ मंडप आहेत. मतदारांसाठी सावलीची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्पची व्यवस्था आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी बुथ लेव्हल मॅनेजमेंटचा प्लॅन तयार आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सोईसुविधा उपलब्ध आहेत. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय उपचार तातडीने मिळतील, असे नियोजन आहे. 

ब्रेल व्होटर स्लिप-

मतदानासाठी विधानसभा मतदारसंघात महिला, युवक आणि दिव्यांग कर्मचारी संचालित प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. तेथे मतदारांना सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. 

विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एका मतदान केंद्रांचे संचालन महिला, तरुण आणि दिव्यांग अधिकारी व कर्मचारी करणार आहेत. दिव्यांग मतदारांना ब्रेल व्होटर स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी रिंगरूट व शटल रूटवर दिव्यांग मतदारांसाठी दिव्यांग सुलभ बस चालविण्यात येणार असून, रिक्षा, टॅक्सीचीही व्यवस्था आहे.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होत असून, त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना रविवारी मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट, मतदार यादी आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. जोगेश्वरी येथे हे साहित्य मतदान केंद्रांवर नेताना कर्मचारी. तर, धारावी येथील केंद्रावर साहित्याची तपासणी करण्यात आली. (छाया :  दत्ता खेडेकर, सुशील कदम)

मतदान केंद्रांवर विविध सुविधा -

उपनगरात मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र मतदानाची टक्केवारी अनेकदा कमी असते. यावेळी उन्हाळ्यात मतदान होत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मतदारांसाठी बूथ व्यवस्थापन संकल्पनेच्या माध्यमातून अनेक सोयीसुविधा, नवीन गोष्टी हाती घेतल्या आहेत. - राजेंद्र क्षीरसागर, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर 

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्रभारतीय निवडणूक आयोग