मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान; भांडुपच्या खिंडीपाड्यातील मतदान केंद्रात वीजपुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:49 AM2024-05-21T10:49:27+5:302024-05-21T10:52:31+5:30

भांडुपच्या खिंडीपाड्यातील ओमेगा हायस्कूल येथील मतदान केंद्रात दुपारच्या वेळेस अचानक वीजपुरवठा खंडित झाला.

lok sabha election 2024 voting by mobile flashlight because power supply cut off in bhandup khindipada polling station | मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान; भांडुपच्या खिंडीपाड्यातील मतदान केंद्रात वीजपुरवठा खंडित

मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान; भांडुपच्या खिंडीपाड्यातील मतदान केंद्रात वीजपुरवठा खंडित

मुंबई : कडक उन्हामध्ये आधीच हैराण झालेले असताना भांडुपच्या खिंडीपाड्यातील ओमेगा हायस्कूल येथील मतदान केंद्रात दुपारच्या वेळेस अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मतदारांसह कर्मचाऱ्यांची तारांबळ झाली. 

मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात मतदारांनी मतदान केले. ओमेगा शाळेच्या छोट्याशा जागेतच मतदान केंद्र आहे. मूळ रस्त्यापासून एक ते दीड किलोमीटर आतमध्ये असल्याने धापा टाकत मतदान केंद्रावर पोहोचत असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी मतदारांसह कर्मचारी घामेघूम झाले. कर्मचाऱ्यांनी मतदानात खंड पडू दिला नाही. मतदार केंद्रात मोबाईलला बंदी होती; मात्र लाईट नसल्याने मोबाईल आत नेण्यास परवानगी देण्यात आली. मोबाईलच्या प्रकाशात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जवळपास अर्धा ते पाऊण तास वीजपुरवठा खंडित झाल्याने मतदारांसह कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी एक गर्भवती महिलादेखील घामेघूम झालेली दिसून आली.

अमेरिकेहून आलो अन् यादीत नावच नाही-

१) मुलुंडच्या म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या हेमंत सामंत (६५) हे आरसीएफमधून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते पत्नीसह अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या मुलींकडे असतात. मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी सामंत यांनी पत्नीसह मुंबई गाठली. 

२) मतदान करण्यासाठी गेलो असता यादीत नाव मिळाले नाही. जुन्या कागदपत्रांची फाईल चाळली. त्यातून मतदार कार्ड शोधून काढले. मात्र, नावच नसल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी हात वर केले. 

३) पत्नीचे नाव मिळाले मात्र माझे नाही. गंमत म्हणजे शेजारच्याचे मतदार स्लीप आमच्या घरात आल्या; मात्र आमचीच नावे आले नाहीत, याचे आश्चर्य वाटते, असे सामंत यांनी सांगितले. 

तेव्हाचा काळ उमेदीचा होता -

पामएकर्स या सोसायटीत  राहणारे ७४ वर्षीय अशोक दातार या आजोबांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकांना ते मतदान करण्यासाठी सांगताना दिसले. दातार म्हणाले, ७१ मध्ये पहिल्यांदा मतदान केले. त्यानंतर नियमित मतदान करतो. तेव्हाचा काळ उमेदीचा होता; मात्र, सध्या ती मजा राहिलेली नाही; पण मतदान करायलाच हवे, असेही त्यांनी सांगितले.

९२ वर्षीय आजीनेही बजावला हक्क-
 
९२ वर्षीय उषा दळवी यांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. त्यांनी अन्य नागरिकांनाही मतदान करण्याबाबत सांगितले. पामएकर्समध्ये मतदानासाठी स्वयंसेवक ज्येष्ठांना ने-आण करताना दिसले.

Web Title: lok sabha election 2024 voting by mobile flashlight because power supply cut off in bhandup khindipada polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.