अणुशक्तीनगरचा कौल कोणाकडे? नवाब मलिकांची भूमिका गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 11:28 AM2024-05-06T11:28:40+5:302024-05-06T11:33:28+5:30
लोकसभेच्या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील विधानसभेच्या अणुशक्तीनगर भागाचा कौल कोणत्या पक्षाला जाणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : लोकसभेच्या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील विधानसभेच्या अणुशक्तीनगर भागाचा कौल कोणत्या पक्षाला जाणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक हे आमदार आहेत. मात्र त्यांचा पाठिंबा कोणाला, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे नवाब मलिकांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असून नवाब मलिक यांच्या आदेशानुसारच कोणत्याही बाजूचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे कार्यकर्ते सांगतात.
देवनार, ट्रॉम्बे, चित्ता कॅम्प, आरसीएफ वसाहत, मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर, बीएआरसी, मंडाळा गाव या भागांचा समावेश अणुशक्तीनगर मतदारसंघात येतो. या मतदारसंघात दोन लाख ६५ हजार २४९ मतदार आहेत. मराठी मतांखालोखाल या मतदारसंघात मुस्लिमांचे प्राबल्य आहे.
त्याचबरोबर उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य मतदारांची संख्याही मोठी आहे. लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन शिवसेनेचे आणि आता शिंदेसेनेचे उमेदवार असलेल्या राहुल शेवाळे यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. शेवाळे यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६३ हजार २५३ मते मिळाली होती तर त्यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ गायकवाड यांना ५४ हजार ६०४ मते मिळाली होती.
मतांचे अंदाजे प्रमाण-
मराठी ३९
मुस्लीम ३०
उत्तर भारतीय १६
दक्षिण भारतीय १०
गुजराती राजस्थानी ३
ख्रिश्चन १
इतर १