Join us

बॉलीवूडच्या अभिनेत्यांना नेते करण्याची गरज कोणाला?

By मनोज गडनीस | Published: March 30, 2024 7:32 AM

Lok Sabha Election 2024 : राजकीय पक्षांसोबत जाण्यात बॉलीवूडमधील कलाकारांना रस आहे का, या मुद्याऐवजी कलाकार मंडळी ही राजकीय पक्षांची अपरिहार्यता असल्याचे विश्लेषण केले जात आहे.

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी अभिनेत्री कंगना राणौत हिला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिल्यानंतर आता अन्य राजकीय पक्षांतर्फे देखील आणखी काही बॉलीवूड कलाकारांना तिकीट मिळणार का, हे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अशा कलाकारांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून त्या जागेच्या यशाची पेरणी करणे याकडे राजकीय पक्षांचा कल असल्याचे दिसते. 

राजकीय पक्षांसोबत जाण्यात बॉलीवूडमधील कलाकारांना रस आहे का, या मुद्याऐवजी कलाकार मंडळी ही राजकीय पक्षांची अपरिहार्यता असल्याचे विश्लेषण केले जात आहे. तसेच, प्रत्येक वेळी कलाकाराला तिकीट जरी दिले नाही तरी लोकप्रिय कलाकारांना प्रचारात उतरवून देखील मतदारांना आकृष्ट करण्याकडेही राजकीय पक्ष विशेष लक्ष देत आहेत. यंदा राम मंदिराचे काम पूर्ण झाले. त्यानंतर १९८० च्या दशकात गाजलेल्या रामायण मालिकेत रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांनाही भाजपाने तिकीट देत निवडणुकीतील रामाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

अलीकडेच अभिनेते गोविंदा हेदेखील शिंदे गटात दाखल झाले आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांची लोकप्रियता मोठी आहे. त्यांना थेट तिकीट देणार की प्रचारात उतरवत त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. 

गेल्या निवडणुकीत मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिचा पराभव झाला असला तरी तिचादेखील जलवा लोकांनी अनुभवला होता.  

निवडणुकीच्या आखाड्यात यशस्वी ठरलेले कलाकारदिलीप कुमार, नर्गिस, अमिताभ बच्चन, धर्मेन्द्र, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना, हेमा मालिनी, शबाना आझमी, सुनील दत्त, राज बब्बर, दारा सिंग, स्मृति इराणी, नितीश भारद्वाज, रामायण मालिकेत रावणाची भूमिका केलेले अरविंद त्रिवेदी अशा दिग्गजांनी राजकारणाचा फडही गाजवला होता. तर, राज्यसभेत जया बच्चन यांच्यापासून जावेद अख्तर यांच्यापर्यंत लोकांनी सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून आले आहे.

दक्षिणेचा दबदबादक्षिण भारतामध्ये सिनेमा हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कलाकारांना तेथील जनता देवाप्रमाणेच मानते. त्यामुळे दक्षिणेतील अनेक कलाकारांची चाहत्यांनी मंदिरेदेखील बांधली आहेत. त्यामुळे एनटीआर, एमजीआर, जयललिता, करुणानिधी अशा कित्येक कलाकारांनी कलेच्या प्रांताला राम राम करत राजकारणात आपला जम बसवला. एवढेच नाही तर कित्येक दशके राज्यसत्ता उपभोगली. या कलाकारांनी आपले स्वतःचे राजकीय पक्ष काढत ते जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :बॉलिवूडलोकसभा निवडणूक २०२४कंगना राणौत