आज नाराजीचा नव्हे, जल्लोषाचा दिवस; तिकीट कापल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 06:32 PM2019-04-03T18:32:18+5:302019-04-03T18:35:23+5:30
किरीट सोमय्यांऐवजी भाजपाकडून मनोज कोटक यांना संधी
मुंबई: शिवसैनिकांचा रोष आणि त्यांनी घेतलेली ठाम भूमिका यामुळे भाजपा खासदार किरीट सोमय्यांच्या उमेदवारीबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून सस्पेन्स कायम होता. अखेर ईशान्य मुंबईसाठीची उमेदवारी आज भाजपानं जाहीर केली. भाजपानं विद्यमान खासदार सोमय्यांचा पत्ता कापत मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. पक्षानं घेतलेल्या या निर्णयाबद्दल सोमय्यांनी आनंद व्यक्त केला. आज नाराजीचा दिवस नसून जल्लोषाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया त्यांनी 'लोकमत'कडे व्यक्त केली.
मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सोमय्यांनी आनंद व्यक्त केला. 'माझ्या लहान भावाला लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळाल्याचा आनंद आहे. मनोज कोटक ईशान्य मुंबईचा खासदार होईल आणि लोकसभेत तो मुंबईचं उत्तमपणे प्रतिनिधीत्व करेल, असा विश्वास वाटतो. तरुण, तडफदार मनोजला मुंबईच्या समस्यांची चांगली जाण आहे. महापालिकेत काम केल्यानं त्याला शहराचे प्रश्न माहिती आहेत. मुंबईकरांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी तो लोकसभेत करेल,' असं सोमय्यांनी म्हटलं.
यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिल्याबद्दल कोटक यांनी पक्ष नेतृत्त्वाचे आभार मानले. 'पक्ष नेतृत्त्वानं माझ्यावर विश्वास दाखवला. सोमय्यांच्या आशीर्वादानं पक्षानं दिलेली कामगिरी नक्की पार पाडेन, असा विश्वास वाटतो. किरीट सोमय्यांनी त्यांच्या कामाचा ठसा ईशान्य मुंबईत उमटवला आहे. त्यांच्या कामांना गती देण्याचं काम करण्यात येईल. ईशान्य मुंबईसह संपूर्ण शहराचा विकास माझ्या अजेंड्यावर असेल,' अशा शब्दांमध्ये कोटक यांनी तिकीट मिळाल्यानंतर आपल्या भावना बोलून दाखवल्या.