Join us

तुमच्या मतदानातून भुरट्याला त्याची जागा दाखवून द्या; मिहिर कोटेचा यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 4:38 PM

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज होतेय. तत्पूर्वी मुलुंडमधील भाजपा-उबाठा गट यांच्यातील राडा यामुळे ईशान्य मुंबईतील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात भाजपा उमेदवार मिहिर कोटेचा यांनी मतदारांना आवाहन करत तुमच्या मतदानातून भुरटल्याला त्याची जागा दाखवून द्या असं आवाहन करत मविआ उमेदवार संजय दिना पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

मिहिर कोटेचा म्हणाले की, प्रचार संपत असताना आतापर्यंतच्या काळात माझ्यावर ४ वेळा हल्ला करण्यात आला. केवळ मालमत्तेचे नुकसान केले नाही तर माझ्या महिला कार्यकर्त्यांवरही विनयभंग करण्याचा प्रयत्न केला हे मी विसरणार नाही आणि माफ करणार नाही. आता या गुंड प्रवृत्ती, ड्रग्स आणि मटका याला साथ देणारा तुम्हाला हवा की जनतेचा सेवक हवा हे निवडण्याची वेळ तुमच्यावर आली आहे असं त्यांनी जनतेला सांगितले. 

त्याचसोबत तुम्ही मला मत दिलं ते राष्ट्रहितासाठी आणि मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी असणार आहे. त्यामुळे ही तुमच्या आणि माझ्या परीक्षेची वेळ आहे असंही कोटेचा यांनी म्हटलं. तसेच मी पंतप्रधान मोदींच्या सभेत असताना हा भेकड हल्ला केला. पहिल्या दिवसापासून विरोधी उमेदवार घाबरले आहेत म्हणून वारंवार गुंडगिरीचा प्रयोग केला जात आहे असा आरोपही कोटेचांनी केला.  

मुलुंडमध्ये काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत सभा चालू असताना मुलुंडमध्ये उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला होता. कोटेचा यांच्या वॉर रूम मधून १ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या रक्कमेबाबत चौकशी सुरू आहे. रक्कम ताब्यात घेतली तेव्हा योग्य माहिती देता न आल्याने ती रक्कम जप्त करत चौकशी सुरू असल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. तर दुसरीकडे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाने कोटेच्या यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली.  

टॅग्स :मिहिर कोटेचासंजय दिना पाटीलमुंबई उत्तर पूर्वलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४