मुंबई - MNS on Sanjay Raut ( Marathi News ) संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांना आज रोज मनसेवर का बोलावं लागतंय? या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ज्यादिवशी राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत. त्यामुळे ते वाट्टेल ती विधानं करतायेत. ४ जूननंतर ज्या संजय राऊतांनी शरद पवारांकडून उबाठा संपवण्याची सुपारी घेतलीय ते सामनामध्ये संपादकच काय कारकून म्हणूनही राहणार नाही असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, आज महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी लोकांना या सभेची उत्सुकता आहे. दोन कट्टर हिंदुत्ववादी नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. केवळ राज्यातील नव्हे देशातील जनतेचे लक्ष या सभेवर असेल. सगळ्यांसारखी आम्हालाही उत्सुकता आहे. आम्हाला संपणारे बोलणारे ४ जूननंतर स्वत:चं संपणार आहेत असं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने बंद होणार आहेत. त्यातील राज ठाकरे एक दुकान आहेत. तीन-चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होणार आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रात कोणीही येऊ दे, जितक्या सभा घेतील तितक्या त्यांच्या सीट कमी होतील. पंतप्रधान मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात, म्हणजे तुम्ही दहा वर्षांत काही केले नाही म्हणून येत आहात. असे असते तर ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या, त्यांना मांडीवर घेऊन बसावे लागले नसते. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात, त्यांच्याबरोबरच जातात, ही राज ठाकरे यांची खासियत आहे अशी जहरी टीका राऊत यांनी केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत सभा घेत असून तत्पूर्वी ते दादरच्या चैत्यभूमीवर, वीर सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देणार आहेत. मोदी-राज यांच्या सभेसाठी आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि चोख व्यवस्था करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणारी गर्दी पाहता वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.