Join us

लोकसभा निवडणूक 2019: ...म्हणून मुंबईत जिंकली युती; 'ही' होती भाजपा-शिवसेनेची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 3:50 PM

मुंबईतील सर्वच्या सर्व सहा मतदारसंघांमध्ये युतीनं बाजी मारली. शिवसेना आणि भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले. त्यामुळे युतीनं 2014 मधील ...

मुंबईतील सर्वच्या सर्व सहा मतदारसंघांमध्ये युतीनं बाजी मारली. शिवसेना आणि भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले. त्यामुळे युतीनं 2014 मधील कामगिरीची पुनरावृत्ती केली. शिवसेना, भाजपाच्या उमेदवारांच्या यशामागील कारणांचा घेतलेला हा आढावा...

दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांचा पराभव केला. विजयाची तीन कारणं-1. उच्चभ्रू वस्तीत ठेवलेला सुसंवाद विजयाला हातभार लावणारा ठरला.2. 'आपला माणूस' ही ओळख मतदारांना भावली.3. राज पुरोहित व मंगलप्रभात लोढा यांनी युतीच्या मनोमिलनासाठी केलेले प्रयत्न. 

दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळेंनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना पराभूत केलं.विजयाची तीन कारणं-1. संसदेतील कामगिरी आणि तरुण, उत्साही खासदार ही प्रतिमा फायद्याची ठरली.2. स्वत: उद्धव ठाकरे यांनी सभा घेत धारावीकरांना घातलेली साद.3. भाजपा कार्यकर्ते मैदानात 

उत्तर मुंबईत भाजपाच्या गोपाळ शेट्टी काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा दारुण पराभव केला.विजयाची तीन कारणं-1. 28 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून असलेला जनसंपर्क.2. मतदारसंघात भाजपाचे नेटवर्क शिस्तबद्धपणे कार्यरत राहिले.3. विरोधी उमेदवाराला प्रसिद्धी मिळत असताना नकारात्मक प्रचारापासून लांब राहिल्याचा झाला फायदा.

उत्तर मध्य मुंबईत भाजपाच्या पूनम महाजन यांनी काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांचा दुसऱ्यांदा पराभव केला.विजयाची तीन कारणं-1. आश्वासने पूर्ण करण्यासाठीची धडपड, सकारात्मकपणे मतदारांपर्यंत पोहोचवली.2. स्थानिक पातळीवर मजबूत असलेली पक्ष संघटना सर्व शक्तीनिशी मैदानात उतरली.3. प्रचारासाठी दिग्गज नेते आवर्जून उपस्थित राहिल्यानं पडला प्रभाव.
उत्तर पूर्व मुंबईत भाजपाच्या मनोज कोटक यांनी राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांचा पराभव केला. विजयाची तीन कारणं-1. विद्यमान खासदारांच्या जागी नवीन चेहरा देण्याची खेळी यशस्वी.2. मराठी, अमराठी वाद निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव त्यांच्यावरच उलटला.3. शिवसैनिकांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेत आपली कामगिरी चोख बजावली. 

उत्तर-पश्चिम मुंबईत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांच्यावर मात केली.विजयाची तीन कारणं-1. खासदार म्हणून पाच वर्षांतील कामगिरी महत्त्वाची ठरली.2. युतीच्या कार्यकर्त्यांमधील समन्वय कामी आला. मोदींसाठी हेवेदावे विसरून भाजपा कार्यकर्ते कामाला लागले.3. निरुपम यांच्याकडे उत्तर भारतीय मते वळतील हा दावा फोल. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९शिवसेनाभाजपाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019