सट्टाबाजारामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे; भाजपकडे अधिक कल : निकालाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:08 AM2024-06-04T09:08:47+5:302024-06-04T09:11:36+5:30
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून, मुंबईसह राज्यभरातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य त्यात ठरणार आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून, मुंबईसह राज्यभरातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य त्यात ठरणार आहे. दुसरीकडे, याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सट्टाबाजारातही कोट्यवधींची उलाढाल सुरू आहे.
मुंबईसह काही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी मतदार याद्यांतील घोळ, मतदानाबाबतची उदासीनता आणि उष्णतेची लाट आदी अनेक कारणांमुळे काही ठिकाणी मतदान अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सट्टाबाजारात देखील मोठी उलाढाल होतानाचे चित्र आहे. सध्या तरी देशात भाजपचीच सत्ता येईल, असे सट्टाबाजाराला वाटत आहे. सट्टाबाजाराचा हा अंदाज असला, तरी राजकीय गणिते बदलल्यास सट्टाबाजाराचा कलही बदलणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांप्रमाणेच आता सट्टाबाजारात देखील या निवडणुकांचे वारे वाहत असून, साऱ्यांना प्रतीक्षा आहे ती या निवडणुकीच्या अंतिम निकालाची. त्यामुळे खरे चित्र निकालावरूनच स्पष्ट होणार आहे.
मुंबईत लोकसभेच्या सहा मतदारसंघांत महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. एकूणच अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या लोकसभेला हजारो कोटींचा सट्टा लावण्यात आला होता. यामध्ये अनेक उमेदवारांवर विविध भावही लावण्यात आले होते.