Join us

आशिष शेलारांचा यु-टर्न, आधी म्हणाले राजकारण सोडणार, आता म्हणाले, "आधी उद्धव ठाकरेंनी राजकीय ..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 3:04 PM

Ashish Shelar : राजकीय सन्यास घेण्याच्या विधानावरुन आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी यु-टर्न घेतल्याचे दिसत आहे.

Ashish Shelar ( Marathi News ) : ४ जून रोजी लोकसभेचे निकाल समोर आले. महाराष्ट्रात भाजपाला मोठा धक्का बसला. मुंबईतही महायुतीला मोठा फटका बसला आहे. तर देशात एनडीएला बहुमत मिळाले आहे. दरम्यान, निकालादिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. निकालावरुन आशिष शेलार राजकारण सोडणार असल्याचे बोलत आहेत. या व्हिडीओवरुन ठाकरे गटाच्या नेत्यांनी आशिष शेलार यांना डिवचले. दरम्यान, आज पत्रकारांसोबत संवाद साधताना शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

“आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला

शेलार यांचे वक्तव्य झाले व्हायरल

शेलार हे काही दिवसांपूर्वी वृत्त वाहिन्यांशी बोलताना असे म्हणाले होते की, उद्धव ठाकरेजी देशात भाजपच्या ४५ जागा येणार नाहीत असे तुम्ही म्हणता आणि समजा त्यापेक्षा अधिक जागा आल्या तर तुम्ही राजकारण सोडाल काय? माझे म्हणणे तुम्ही रेकॉर्ड करा. उद्धवजी! गेल्यावेळी (२०१९) तुम्ही आमच्यामुळे १८ जागांवर निवडून आलेला होता. तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल आणि मर्दांचे नेतृत्व करत असाल तर माझे तुम्हाला जाहीर आव्हान आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडी मिळून तुम्ही १८ जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन, असे शेलार यांनी म्हटले होते.

आशिष शेलारांनी दिले प्रत्युत्तर

दरम्यान, आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. " व्हिडीओ संपूर्ण बघितला तर आपल्या लक्षात येईल की, आधी उद्धव ठाकरेंना सन्यास घ्यावा लागेल. कारण ४५ च्यावर देशात जागा येणार नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. ४५ च्या वर भाजपा गेली आहे, आता उद्धवजी सन्यास घेणार का? उद्धवजी आता तोंड का लपवत आहेत ते सांगावं, असा पलटवार भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. 

"रोज सकाळी बालनाट्य करतात त्यांना सगळं तसंच दिसतं. रोज सकाळी उठून ते बालनाट्य करतात, असा टोलाही संजय राऊत यांना शेलार यांनी लगावला. 

सुषमा अंधारेंचा खोचक टोला

सोशल मीडियावरील एक्सवर पोस्ट करताना सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना… म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळे देता येईल, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

टॅग्स :आशीष शेलारभाजपालोकसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणूक २०२४ निकाल