"राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत...." आशिष शेलार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 04:30 PM2024-06-08T16:30:10+5:302024-06-08T16:36:38+5:30
Ashish Shelar : भाजपाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक घेण्यात आली, या बैठकीत आगामी होणाऱ्या विधासभा निवडणुका आणि लोकसभेच्या निकालावर भाजपा नेत्यांनी चर्चा केली.
Ashish Shelar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले. एनडीए'ला बहुमत मिळाले असून ९ जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. या लोकसभा निवडणुकीत महायुतीने १७ जागा तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत. भाजपाने ९ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत राज्यात भाजपाचा पराभव झाला आहे. दरम्यान, लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक भाजपच्या दादर येथील वसंतस्मृती पक्ष कार्यालयात झाली. यावेळी भाजपा नेते आशिष शेलार यांनी लोकसभेच्या निकालावरुन भाष्य केले.
विरोधकांच्या 'या' ४ नॅरेटिव्हमुळं महायुतीला बसला फटका; देवेंद्र फडणवीसांचं विश्लेषण
"राज्यातील निकाल अनपेक्षित आहे, शरद पवार साहेबांनाही त्यांचे चार पेक्षा जास्त खासदार निवडून येती असं वाटत नव्हतं. राज्यात चुकीचा प्रचार केला आहे यामुळे भाजपाच्या कमी जागा आल्या आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकांचा निकाल आपल्याला आनंद देणारा नाही, असंही आशिष शेलार म्हणाले.
लोकसभेच्या निकालानंतर आज मुंबईत भाजपाच्या सर्व आमदारांनी बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी सर्व आमदारांसोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चाही करण्यात आली.
"...यामुळे महायुतीला फटका बसला"
या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात ज्याप्रकारे नरेंद्र मोदींना जनतेनं समर्थन दिले, तिसऱ्यांदा सरकार आलं. ओडिशा, आंध्र प्रदेश याठिकाणी आपलं सरकार आलं. मागील ३ निवडणुका मिळून जेवढ्या जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत तेवढ्या जागा या एका निवडणुकीत मिळाल्यात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेली मते ४३.०९ टक्के तर महायुतीला मिळालेली मते ४३.०६ टक्के आहेत. मतांमध्ये जास्त फरक नाही. पण त्यांना ३१ आणि आपल्याला १७, केवळ २ लाख मते महाविकास आघाडीला मिळालीत. मुंबईचा विचार केला तर महाविकास आघाडीला २४ लाख आणि महायुतीला २६ लाख मते आहेत. याचं विश्लेषण केले तर आपण केवळ ३ पक्षांशी लढत नव्हतो तर एका खोट्या नकारात्मक नॅरेटिव्हला आपण रोखू शकलो नाही असं त्यांनी सांगितले.