मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:18 AM2024-05-09T10:18:32+5:302024-05-09T10:19:19+5:30
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यात मुंबईत मराठी आणि गुजराती असा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
मुंबई - नुकतेच मुंबईतील घाटकोपर परिसरात ईशान्य मुंबईतील मविआचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचाराला एका गुजराती सोसायटीत रोखण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मराठी उमेदवार असल्याने प्रचार करू दिला नाही असं उबाठा गटाने आरोप केला. त्यानंतर पुन्हा मराठी - गुजराती असा वाद समोर आला. मात्र या सोसायटीतील रहिवाशांनी घडलेल्या प्रकारावर भाष्य करत मराठी गुजराती या वादाला राजकारण्यांनी फोडणी दिली असल्याचा आरोप केला.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यात मुंबईत मराठी आणि गुजराती असा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मुंबईतील मतदान जवळ येताच असे वाद दरवेळच्या निवडणुकीत समोर आणले जातात. त्यात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे अशी भीती राजकारण्यांकडून घातली जाते. त्यातून मराठी मतांची पेरणी राजकीय पक्ष करत असतो. यंदाच्या निवडणुकीतही घाटकोपर भागात हेच पाहायला मिळाले.
घाटकोपरच्या गुजराती सोसायटीत मराठी उमेदवाराला प्रचारापासून रोखले अशी बातमी समोर आली. ईशान्य मुंबईतील मविआचे उमेदवार संजय दिना पाटील हे मराठी असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना इमारतीत प्रवेश करण्यापासून अडवले असा आरोप झाला. आता नेमकं हा प्रकार काय घडला त्याबाबत रहिवाशी समोर आले आहेत. घाटकोपरमधील समर्पण सोसायटीत ही घटना घडली. याठिकाणी मराठी लोकांना प्रचारापासून मज्जाव केला असा आरोप केला गेला. परंतु प्रत्यक्षात काही वेगळेच घडल्याचं येथील रहिवाशी सांगतात.
नेमकं काय घडलं?
ज्यावेळी ते लोक आमच्याकडे आले, तेव्हा दुसऱ्या पक्षाला आम्ही प्रचारासाठी वेळ दिली होती. आम्हाला राजकीय वाद नको यासाठी आम्ही त्यांना नंतर येण्यास सांगितले. आम्ही त्यांना विरोध केला नाही. फक्त दोन राजकीय पक्ष समोरासमोर येऊ नये त्यातून वाद होऊ शकतात त्यातून आम्ही त्यांना दुसऱ्या वेळेस यायला सांगितले असं या सोसायटीतील रहिवाशी असलेल्या सेजल देसाई यांनी म्हटलं.
काय आहे प्रकार?
घाटकोपर पश्चिमेकडील माणिकलाल भागात असलेल्या समर्पण सोसायटी मविआचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे कार्यकर्ते रात्री ८.३० वाजता प्रचारासाठी गेले होते. या कार्यकर्त्यांना सोसायटीत पत्रके वाटायची होती. परंतु त्यांना तिथे अडवले असा आरोप करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. बऱ्याच वादानंतर इथं पोलीस आले. त्यांनी मध्यस्थी करत २ जणांना सोसायटीत पाठवले आणि ते कार्यकर्ते पत्रक वाटून निघून गेले. मात्र त्यानंतर गुजराती सोसायटी असल्याने मराठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आले असा आरोप ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाकडून करण्यात आला. त्यानंतर या वादावर संजय राऊतांनीही भाष्य करत भाजपावर निशाणा साधला.