Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुस्लीम व्होट बँकेबाबत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना ना मराठी माणसांची मते मिळाली ना उत्तर भारतीयांची. ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदूंचा त्याग केला त्यांचीच मते उद्धव यांना मिळाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. या सगळ्यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पाडली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मतदारांचे आभार मानले. यासह भाजप आणि मोदींवर टीका करत विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मराठी माणसे आम्हाला का मतदान करणार नाहीत असं म्हटलं. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक आणि बिगर मराठी तसेच बिगर हिंदी भाषिकांच्या मतांमुळेच मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर ठाकरे गटाने निवडणूक जिंकली असे म्हटलं होतं.
"महाविकास आघाडी ही राज्यामध्ये फेक नेरेटिव्ह पसरवण्यात यशस्वी झाली असल्यानेच भाजपच्या जागा कमी झाल्या. मुंबईत लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या ४ जागा केला तर लक्षात येईल की सामान्य मुंबईकर आणि मराठी माणसांनी उद्धव ठाकरेंना मतदान केलं नाही. तसेच मुंबईत चार- चार पिढ्या घालवलेल्या उत्तर भारतीय मुंबईकरांनी ठाकरेंना मतदान केलं नाही. गेले ४ महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, तसेच ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो म्हणलं सोडलं होतं. तसंच ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणं सोडून जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं. केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी राजकीय गणित जिंकले," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना मराठी मतांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना भाजपला वास्तवाची जाणीव नाही असं म्हटलं. "नरेंद्र मोदी यांनी स्वतः सांगितले की त्यांचे बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सानिध्यात गेले. खाल्ल्या मिठाला ते जागले आहेत की नाही. वोट जिहाद म्हणजे काय मला कळलं नाही. आम्हाला मते दिली तर आम्ही संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना देतील असे त्यांनी सांगितले. ते खरं कथानक होतं का. ४०० पारची घोषणा का दिली होती. आम्हाला मराठी मतं कमी का मिळतील. लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला सर्वधर्मियांनी मतदान केले. त्यात हिंदू, मुस्लिम, शीख आहेत. मुंबई लुटणाऱ्यांना मराठी माणूस मत देईल का? अजूनही भाजपला वास्तवाची जाणीव आली नसेल तर त्यांना निवडणुकीच्या निकालाच्या वास्तवाला सामोरं जावं लागेल. त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे हे त्यांनी आधी ठरवावं," असे उद्धव ठाकरे म्हणाले.